चलो आझाद मैदान आंदोलनाच्या जागृतीसाठी बोडकेनहट्टी येथे 7 रोजी बैठक
बेळगाव : गिरणी कामगारांना अथवा त्यांच्या वारसदारांना मुंबईतच आणि तेही मोफत घरे मिळावीत या मागणीसाठी चलो आझाद मैदान आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या जागृतीसाठी शनिवार दि. 7 मार्च रोजी दुपारी 12 वाजता बोडकेनहट्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काळम्मादेवी मंदिरात गिरणी कामगारांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी श्रमिक संघटनेच्यावतीने कॉ. उदय भट, कॉ. दत्तात्रय आत्याळकर, कॉ. अतुल दिघे उपस्थित राहणार आहेत.
सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील गिरणी कामगार मुंबई येथे मोठ्या प्रमाणात काम करत होते. एकेकाळी मुंबई कापड गिरणी मोठ्या प्रमाणात चालत होत्या. त्यामुळे सीमाभागातील कामगार तेथे जाऊन काम करत होते. या कामगारांनी मुंबईच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. 1990 मध्ये महाराष्ट्र सरकार व मुंबई महापालिकेने गिरण्यांच्या जागेचा वापर वाणिज्य आणि रहिवासी वापरासाठी करण्याची परवानगी दिली. त्यामुळे गिरणी मालकांना प्रचंड संपत्ती मिळाली. पण गिरणी कामगारांच्या पोटावर टाच आली व ते बेरोजगार झाले.
श्रमिक संघटनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांनी सरकारच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला. त्यामुळे सरकारला नमते घ्यावे लागले. गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना घर देण्याचा निर्णय घ्यावा लागला. परंतु आजतागायत त्याची अंमलबजावणी झाली नाही. गिरणी कामगार किंवा त्यांचे वारसदार यांना मुंबईत मोफत घर मिळावे या मागणीसाठी चलो आझाद मैदान हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी शनिवार दि. 7 रोजी बोडकेनहट्टी येथे बैठक बोलविण्यात आली आहे.
चलवेनहट्टी, बोडकेनहट्टी, हंदिगनूर, अगसगे, अतिवाड, कुरिहाळ, कट्टनभावी, म्हाळेनट्टी, मण्णीकेरी, बेकिनकेरे, किटवाड, बंबरगा, केदनूर आदी भागातील गिरणी कामगारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मनोहर हुंदरे (चलवेनहट्टी), राजू तवनोजी (बोडकेनहट्टी), बाळू पाटील (हंदिगनूर), जोतिबा पाटील (चलवेनहट्टी), केदारी पाटील (अतिवाड) यांनी केले आहे.