ईकॉमर्स क्षेत्रातील मीशो आणणार आयपीओ
1 अब्ज डॉलर्सची करणार उभारणी : याचवर्षी येणार आयपीओ
मुंबई :
ई कॉमर्स क्षेत्रातील कंपनी मीशो लवकरच आपला आयपीओ शेअर बाजारात दाखल करणार असल्याची माहिती आहे. याच वर्षी कंपनीचा आयपीओ बाजारात लॉन्च होणार असून याअंतर्गत कंपनी 1 अब्ज डॉलर्सची रक्कम उभारणार असल्याचे समजते. सध्याला आयपीओसंदर्भात कंपनी मॉर्गन स्टॅनले, कोटक महिंद्रा कॅपिटल आणि सिटी या सल्लागार कंपनीशी चर्चा करत असल्याचे समजते. येणाऱ्या आठवड्यात आयपीओला लागणारी आवश्यक कागदपत्रे कंपनी सादर करणार असल्याचेही सांगितले जात आहे.
कधी येणार आयपीओ
मिळालेल्या माहितीनुसार येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये किंवा दिवाळीच्या दरम्यान मीशोचा आयपीओ लॉन्च होऊ शकतो. वर्षाच्या सुरुवातीला मीशोने 250 ते 270 दशलक्ष डॉलरची उभारणी केली होती. टायगर ग्लोबल, थिंक इन्वेस्टमेंटस् आणि मार्स ग्रोथ कॅपिटल यांच्यामार्फत ही रक्कम कंपनीने उभारली होती. याअंतर्गत कंपनीने आतापर्यंत 550 दशलक्ष डॉलर्सची उभारणी केलेली आहे.
आर्थिक स्थिती
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीने 33 टक्के वाढीसह 7615 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. आर्थिक वर्षामध्ये कंपनीने 53 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. जो मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कमी करण्यात कंपनीला यश आलेलं आहे. कारण या आधीच्या आर्थिक वर्षात कंपनीला 1569 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.