तिसऱ्या पतीपासूनही मीरा वासुदेवन विभक्त
आयुष्यातील बेस्ट टाइम असल्याचा दावा
मल्याळी अभिनेत्री मीरा वासुदेवनने सिनेमॅटोग्राफर विपिन पुथियांकम याच्यापासून घटस्फोट घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत स्वत:चा तिसरा विवाह संपुष्टात आल्याचे चाहत्यांना कळविले आहे. मी ऑगस्ट 2025 पासून सिंगल असून स्वत:च्या जीवनातील सर्वात सुंदर आणि शांतिपूर्ण काळातून जात असल्याचे तिने म्हटले आहे.
मीरा आणि विपिन पुथियांकमची पहिली भेट एका टेलिव्हिजन शोच्या सेटवर झाली होती. मग हळूहळू दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले होते. मागील वर्षी मे महिन्यात कोइम्बतूर येथे दोघांनी विवाह केला होता. पलक्कडचा रहिवासी असलेला विपिन हा सिनेमॅटोग्राफर म्हणून प्रसिद्ध आहे.
मीरा आणि विपिन यांचा विवाह जवळपास एक वर्षे चालला आणि मग दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या घोषणेसोबत मीराने विपिनसोबतची सर्व छायाचित्रे आणि व्हिडिओ हटविल आहेत. यात त्यांच्या विवाहाची छायाचित्रेही सामील होती. मीराने अलिकडेच मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वत:च्या कारकीर्दीची 25 वर्षे पूर्ण केली आहेत.