मीनाक्षी, जस्मीन, लोकेश उपांत्य फेरीत
आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा : भारताचे सहा स्पर्धक पदक फेरीत दाखल
वृत्तसंस्था, उलानबातार (मंगोलिया)
आशियाई मुष्ठियुद्ध पुरुष आणि महिलांच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी दर्जेदार कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या सहा स्पर्धकांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून आपली पदके निश्चित केली आहेत. महिलांच्या विभागात मीनाक्षी, जस्मीन तर पुरुषांच्या विभागात लोकेश, आकाश, हर्ष चौधरी यांच्यासह एकूण सहा स्पर्धकांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
महिलांच्या 48 किलो वजन गटात भारताच्या मीनाक्षी हुडाने जपानच्या युका सदामात्सुचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्याच प्रमाणे महिलांच्या 57 किलो वजन गटात जस्मीन लंबोरियाने चीनच्या चेनवर 5-0 अशा गुणांनी मात करत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले.
पुरुषांच्या विभागात लोकेशने 85 किलो वजन गटात कोरियाच्या किमचा 5-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 75 किलो वजन गटात भारताच्या आकाशने तुर्कीच्या बॅगट्यारोव्हचा 5-0 असा फडशा पाडत पदक फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पुरुषांच्या 90 किलो वजन गटात भारताच्या हर्ष चौधरीने किर्जी प्रजासत्ताकच्या अॅलेबाएव्हचा पराभव करत शेवटच्या चार स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले. 80 किलो वजन गटात भारताच्या अंकूशला जॉर्डनच्या हुसेन लेशाहकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय मुष्ठियोद्ध्यांनी या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करत आपली पदके निश्चित केली आहेत. पुरुषांच्या विभागात भारताच्या सहा स्पर्धकांनी उपांत्य फेरी गाठली आहे.