देवकुमार मीनाला पोल व्हॉल्टचे सुवर्ण, मुरली श्रीशंकरही विजेता
वृत्तसंस्था, रांची
येथे सुरू असलेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत मध्यप्रदेशचे अॅथलिट्स देवकुमार मीना आणि कुलदीप कुमार यांनी पोलव्हॉल्ट या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. देवकुमार मीना सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
पुरूषांच्या पोल व्हॉल्ट या क्रीडा प्रकारात पूर्वीचा राष्ट्रीय विक्रम कुलदीप कुमारने भुवनेश्वरमध्ये 5.41 मी.चा नोंदविला होता. पण रांचीच्या स्पर्धेत मध्यप्रदेशच्या देवकुमार मीना आणि कुलदीप कुमार यांनी समान 5.45 मी.ची नोंद केली. दरम्यान, टायब्रेक नियमाच्या आधारे देवकुमार मीनाला सुवर्णपदक मिळाले तर कुलदीप कुमारला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. सुवर्णपदकासाठी उभय खेळाडूंमध्ये टायब्रेकर नियमाचा अवलंब करण्यात आला. 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पात्र फेरीची मर्यादा 5.25 मी. अशी असून देवकुमार मीना आणि कुलदीप कुमार यांनी ही पात्रता मर्यादा पार केली आहे. आता हे दोन्ही भारतीय अॅथलिट्स आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मुरली श्रीशंकरलाही सुवर्ण
पुरूषांच्या लांब उडीमध्ये मुरली श्रीशंकरने 8.08 मी.ची नोंद करत सुवर्णपदक घेतले. तसेच त्याने राष्ट्रकुल स्पर्धेसाठीची पात्रता मर्यादाही 8.05 मी. पार केली आहे. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने पुरूषांच्या उंच उडीत सुवर्णपदक मिळविताना 2.28 मी.ची नोंद करत आगामी राष्ट्रकुल स्पर्धा पात्रतेची 2.20 मी.ची मर्यादा गाठली आहे. या क्रीडा प्रकारात आदर्श रामने 2.22 मी.ची नोंद करत रौप्यपदक पटकाविले. तेजस शिरसेने पुरूषांच्या 110 मी. अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना 13.50 सेकंदांचा अवधी घेतला.
तसेच महिलांच्या 10 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत हरियाणाच्या रविनाने 44 मिनिटे 29.66 सेकंदांचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविताना राष्ट्रकुल स्पर्धा पात्रतेची मर्यादा 44 मिनिटे 44.58 सेकंदांची पार केली आहे. महिलांच्या 100 मी. अथडळा शर्यतीत तामिळनाडूच्या के. नंदिनीने 13.24 सेकंदांचा अवधी घेत सुवर्ण तर ओडिशाच्या प्रज्ञान साहुने रौप्य आणि अंजलीने कांस्यपदक घेतले. पुरूषांच्या थाळीफेक प्रकारात सेनादलाच्या धर्मराज यादवने 55.20 मी.ची नोंद करत सुवर्ण, नवदलाच्या भरतप्रीत सिंगने रौप्य आणि पतियाळाच्या ओनम अॅलेसन सिंगने कांस्यपदक मिळविले. राजस्थानच्या राहुल बलोडाने पुरूषांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक घेतले. महिलांच्या हातोडाफेक प्रकारात पंजाबच्या मनप्रित कोरने 59.08 मी.ची नोंद करत सुवर्ण, रेल्वेच्या कुलविंदर कौरने रोप्य आणि ओडिशाच्या दिव्या शांडिल्यने कांस्यपदक मिळविले.