मेदव्हेदेव-ग्रीकस्पूर अंतिम लढत
वृत्तसंस्था / दुबई
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई खुल्या पुरूषांच्या 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाचा डॅनिल मेदव्हेदेव आणि बिगर मानांकीत टेलॉन ग्रीकस्पूर यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेत ग्रीकस्पूरने रशियाच्या आंद्रे रुबलेव्हचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. ग्रीकस्पूरने पाचव्या मानांकीत रुबलेव्हचे आव्हान 7-5, 7-6 (8-6) असा पराभव केला. या सामन्यात खेळताना रुबलेव्हला दुखापतीची समस्या चांगलीच जाणवली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रशियाच्या मेदव्हेदेवने कॅनडाच्या फेलीक्स ऑगेर अॅलिसीमेचा 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा उपांत्य सामना 83 मिनिटे चालला होता. मेदव्हेदेवने ही स्पर्धा 2023 साली जिंकली होती तर आता तो दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. रशियाच्या मेदव्हेदेवने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत एटीपी टूरवरील आतापर्यंत 22 स्पर्धा जिंकल्या आहेत. ग्रीकस्पूरने पहिल्यांदाच एटीपी टूरवरील 500 दर्जाच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी त्याने एटीपी टूरवरील 250 दर्जाच्या तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. दुंबई स्पर्धेत ग्रीकस्पूरने बुबलीक आणि मेनसीक यांना पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे.