फेब्रुवारीपर्यंत 9.8 अब्ज डॉलर्सची औषधे पोहचवली अमेरिकेत
निर्यातीत 36 टक्क्यांची वाढ: व्यापार शुल्क आकारण्याची भीती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
औषध निर्यातीच्या बाबतीत भारताला अमेरिका हा महत्त्वाचा देश राहिला असून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान भारताने 9.8 अब्ज डॉलरच्या औषधाची निर्यात केली असल्याची माहिती मिळते आहे. ही निर्यात वाढ जवळपास 36 टक्के अधिक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अलीकडेच अमेरिकेने भारतावर 26 टक्के व्यापार शुल्क आकारण्यास प्रारंभ केला आहे. मात्र औषधाच्या बाबतीमध्ये अमेरिकेने अद्याप शुल्क आकारण्याची घोषणा केलेली नाही. येणाऱ्या काळामध्ये अमेरिका औषधांवरही आयात शुल्क आकारू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात असून भारत आता अमेरिका व्यतिरिक्त इतर पर्यायी देशांचा औषधांच्या निर्यातीसाठी शोध घेत आहे. 2024-25 मध्ये एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान अमेरिकेची औषध निर्यात 14 टक्के वाढल्याचे फार्मास्युटीकल एक्सपोर्ट्स प्रमोशन कौन्सीलने म्हटले आहे.
नव्या देशांचा शोध जारी
नव्या देशांच्या बाजारपेठेमध्ये औषधांसाठी प्रवेश मिळवायचा असेल तर त्याकरता किमान दीड ते दोन वर्षे लागतात. युद्ध पातळीवर भारताने इतर देशांचा शोध जरी घेतला तरी त्या देशांना औषधे निर्यात करण्यासाठी किमान 2026 चे वर्ष तरी उजाडणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतरच प्रत्यक्षात इतर देशांना औषधांच्या निर्यातीचा प्रारंभ होऊ शकतो अशी ही माहिती मिळते आहे. येणाऱ्या काळात भारतातील मोठ्या औषध कंपन्या अमेरिकेव्यतिरिक्तही इतर देशांमध्ये औषधांची निर्यात करण्यासाठी चाचपणी करणार आहे. अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियान यासारख्या बाजारपेठांमध्ये औषधे निर्यात करण्यासंबंधीचा शोध भारताकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
27 अब्ज डॉलर्सची होणार निर्यात
सद्य स्थितीत एकंदर औषधांच्या निर्यातीचा विचार करता आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान भारताने 26.58 अब्ज डॉलरच्या औषधांची एकंदर निर्यात केली आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये निर्यातीमध्ये 6.95 टक्के वाढ नोंदवलेली आहे. अजूनही मार्चमधील निर्यातीची आकडेवारी येणे बाकी आहे. तरीही अंदाजानुसार संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये निर्यातीचा आकडा 27 अब्ज डॉलर्स राहू शकतो, असेही म्हटले जात आहे. भारत अमेरिकेसह युरोप आणि आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात करतो.