गर्भपाताची औषधे पुरविणारा मेडिकलवाला अटकेत
कोल्हापूर :
शहरातील फुलेवाडी येथील एक दुकान गाळा, जुना बुधवारपेठ येथील पॅथॉलॉजी लॅब आणि जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी) येथे पोलीस आणि आरोग्य विभागाने डिसेंबर महिन्यात छापा टाकला होता. यावेळी गर्भलिंग निदान व गर्भपात करणारे रॅकेट उघड करीत, बोगस डॉक्टरला अटक केली होती. या प्रकरणातील आणखीन एका संशयिताला मंगळवारी दुपारी अटक केली. योगेश शंकर निगवेकर (वय 42 रा. गंगावेश, कोल्हापूर) असे त्याचे नाव असून, तो औषध दुकानदार आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
जुना राजवाडा पोलीस, वैद्यकीय अधिकारी यांनी 19 डिसेंबर, 2024 रोजी शहरातील फुलेवाडीत छापा टाकून, बोगस डॉक्टर दगडू बाबुराव पाटील (वय 45, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर), बजरंग श्रीपती जांभीलकर (वय 31, रा. कसबा ठाणे, ता. करवीर), रेकॉर्डवरील गुन्हेगार गजेंद्र बापूसो कुसाळे (वय 37, रा. सिरसे ता. राधानगरी) या तिघांना अटक केली. बनावट डॉक्टर दगडू पाटील याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने गर्भपाताची औषधे मेडिकल व्यावसायिक योगेश निगवेकरकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी योगेश निगवेकर यास अटक केली. या प्रकरणात यापूर्वी केलेल्या संशयिताचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळल्याने, ते सर्व जण सध्या कळंबा कारागृहाची हवा खात आहेत. तसेच या प्रकरणात आणखी काही संशयिताना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.