जपानमध्ये मेडिकल हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले
3 जण ठार : तिघांना वाचविण्यास यश
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानच्या दक्षिण-पश्चिम भागात मोठी दुर्घटना घडली आहे. एक मेडिकल ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले आहे. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असलेल्या 6 जणांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तीन जणांना जपानच्या तटरक्षक दलाने वाचविले आहे. पायलट हीरोशी हमाडा, मॅकेनिक काजुतो योशिताके आणि 28 वर्षीय नर्स सकुरा कुनीताके यांना समुद्रातून वाचविण्यात आले. हे तिघेही जीवनरक्षक उपकरणांच्या मदतीने समुद्रात तरंगताना आढळून आले होते. तिघांच्या शरीराचे तापमान धोकादायक स्वरुपात कमी झाले होते, परंतु ते शुद्धीत होते अशी माहिती तटरक्षक दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
दुर्घटनेनंतर जपानच्या एअर सेल्फ-डिफेंस फोर्सच्या एका हेलिकॉप्टरने मेडिकल डॉक्ट केई अरकावा, रुग्ण मित्सुकी मोतोइशी आणि त्यांची देखभाल करणारे काजुओशी मोतोइशी यांचे मृतदेह हस्तगत केले आहेत. या सर्वांचा दुर्घटनेनंतर त्वरित मृत्यू झाला होता. दुर्घटनेच्या कारणांचा तपास केला जात असून हेलिकॉप्टर का कोसळले हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे जपानच्या तटरक्षक दलाने सांगितले आहे.