For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वनवासी वैदूंचे वैद्यकीय योगदान

06:26 AM Jan 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
वनवासी वैदूंचे वैद्यकीय योगदान
Advertisement

वनवासी क्षेत्रात परंपरागत स्वरुपात व आपला अभ्यास आणि अनुभवाच्या आधारे सातत्याने व यशस्वीपणे काम करणारे वैद्य म्हणजेच वैदू व प्रशासनांतर्गत वैद्यक विभाग यांनी एकत्र येऊन काम केल्यास काय परिणाम होऊ शकतात याचे उदाहरण आज मध्यप्रदेशातील बडवानी या वनवासीबहुल परिसरात ज्वलंतपणे दिसून येते. वनवासी वैदू व वैद्यकशास्त्र यामध्ये मोठे वा श्रेष्ठ कोण? यावर अनावश्यक चर्चा न करता उभयतांनी एकत्र येऊन दुर्गम भागातील वनवासींना वैद्यकसेवा उपलब्ध करून देण्याचे काम मध्यप्रदेशात, ‘ट्रायबल हेल्थ कोलॅबोरेटिव्ह’ या विशेष उपक्रमाद्वारे होत आहे त्याचीच ही यशोगाथा...

Advertisement

या उपक्रमाची पार्श्वभूमी व तपशील सांगायचा म्हणजे पिरॅमल हेल्थ फाऊंडेशन व क्वालिटी काउंसिल ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या विशेष अभ्यासानुसार आजही सुमारे 61 टक्के वनवासी हे आपल्या उपचारासाठी आपला हात वैदूंच्याच हातात देतात. पिरॅमलचे मुख्याधिकारी आदित्य नटराज यांच्यानुसार वनवासी क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाडी सेविका यांच्यापेक्षा सुद्धा वैदूंचे उपचार व उपचार पद्धतीलाच प्राधान्य देतात, ही वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे वरील अभ्यासाच्या आधारेच वैदूंना आततायीपणे पर्याय न सुचविता त्यांच्या उपचारांचा उपाय परस्पर सहकार्यातून, साधण्याचा विचार झाला व त्यातून मध्य प्रदेशातील ‘ट्रायबल हेल्थ कोलॅबोरेटिव्ह’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची सुरुवात झाली. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील वनवासी क्षेत्रात वैदू म्हणून काम करणाऱ्यांशी व्यापक संपर्क साधण्यात आला. यामुळे वैदू आणि शासकीय प्रशासनासह वैद्यक सेवा क्षेत्रात परस्पर संपर्क समन्वय साधला गेला. परिणामी प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 1500 अनुभवी व जाणकार वैदूंची निवड केली गेली.

Advertisement

त्यानंतर अशा निवडक वैदूंचे ज्ञान, निदान, अभ्यास, उपचार व अनुभव यांचा फायदा वनवासी समाजाला अधिक चांगल्या व प्रभावीपणे कशा प्रकारे होईल यासाठी त्यांना प्रोत्साहन व सहकार्य दोन्ही देण्यात आले. त्यांच्या उपचारांसाठी आवश्यक सामानाची पूर्तता प्रसंगी त्यांच्या पाड्यापर्यंत व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले. या प्रयत्नांचे परिणाम दिसायला लागले. उपचारांसाठी आवश्यक साहित्य विनासायासपणे मिळू लागल्याचे वैदूंच्या निदान-उपचार पद्धतीला अधिक गती प्राप्त झाली. मुख्य म्हणजे यातून वनवासी वैदू आणि वैद्यक विभाग यांच्यात संवाद-संपर्कच नव्हे तर परस्पर आत्मविश्वास साधला गेला व तो वाढीस देखील लागला.

जाणकार व अनुभवी वैदू अशा प्रकारे राज्याच्या आरोग्य प्रशासनाच्या संपर्कात आल्याने काही उपचारांसाठी ही मंडळी आपल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र वा सरकारी रुग्णालयात पाठवू लागली. यातून गरजू रुग्णांना वेळेवर उपचार तर मिळू लागलेच शिवाय आरोग्य यंत्रणेचा वनवासी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क येऊ लागला. वनवासी वैदू व प्रत्यक्ष वनवासींना एका मर्यादेनंतर व विशिष्ट उपचारासाठी डॉक्टरी औषधांचे महत्त्व मान्य झाले. मुख्य म्हणजे हे सारे शक्य झाल्यामुळे सुरुवातीला वैदू आणि वनवासी यांच्याकडून आरोग्य प्रशासनाला होणारा विरोध मावळत गेला.

दरम्यान वनवासींचा वैदूंवर असणारा विश्वास लक्षात घेता पिरॅमल हेल्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून काही निवडक वैदुंना आरोग्य सेवा केंद्रांमध्ये आधी भेटीसाठी व नंतर विचार विनिमयासाठी बोलावण्यात येऊ लागले. सुरुवातीला शंका वा संकोचापोटी त्यांचा प्रतिसाद मर्यादित असे. नंतर या निमित्ताने होणारी चर्चा व परस्परांचे ज्ञान, माहिती आणि अनुभवांची देवाण-घेवाण यामुळे सुरुवातीच्या असणाऱ्या शंका परस्पर माहितीच्या मुळे दूर झाल्या व वैदू आणि वैद्यकीय सेवा या परस्परपूरक असू शकतात याची खातरजमा पटली. या कामी अर्थातच पिरॅमल हेल्थ फाऊंडेशनचे काम महत्त्वाचे ठरले.

पिरॅमल हेल्थ फाऊंडेशनने महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांच्या सीमावर्ती भागातील अक्कलकुवा, घाडगाव व नवापूर या वनवासी तालुक्यात प्रदीर्घ काळपर्यंत केलेल्या कामाचा अनुभव पण याठिकाणी कामी आला. नंदुरबार या वनवासी बहुल जिल्ह्यात वनवासींना कुठलाही आजार वा रोग झाल्यास परिसरातील वैदूकडे जाण्याची पूर्वांपार परंपरा होती. वैदूंवरील विश्वास व शासकीय आरोग्य केंद्र फार दुरवर व दुर्गम ठिकाणी असल्याने उपचार-व्यवस्थेचा ताळमेळ घालणे अवघड होत असे. यावर तोडगा म्हणून वैदू व वैद्य प्रशासन यांच्यात ताळमेळ घालण्याच्या प्रयत्नांवर पिरॅमलने भर दिला व त्याला प्रयत्नपूर्वक यशदेखील प्राप्त झाले.

वनवासी क्षेत्रातील वैदुंच्या यशस्वी होण्याच्या संदर्भात वैदूंचा पिढीजात अभ्यास व त्यांचे या विषयातील ज्ञान या दोन बाबी फार महत्त्वाच्या ठरतात. नवापूर परिसरातील अनुभवी व प्रस्थापित वैदू अशोक कोकणी नमूद करतात की वनवासींवर उपचार करताना त्यांचा आमच्यावर असणाऱ्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची आम्ही नेहमीच काळजी घेतो व त्यासाठी प्रसंगी विशेष प्रयत्न अभ्यास करतो, हेच आमच्या यशाचे मुख्य कारण ठरते. नंदूरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते नव्यानेच जिल्ह्यातील ज्या निवडक 30 वैदुंचा त्यांच्या वनवासी क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी सन्मान करण्यात आला, त्यामध्ये अशोक कोकणी यांचा प्रामुख्याने समावेश होता ही बाब यासंदर्भात उल्लेखनीय तसेच नोंद घेण्यासारखी आहे.

आजही नवापूर जिल्ह्यातील उमेशसिंह वसावे यांच्यासारखे जुने वैदू संशोधन व वनौषधी संकलनासाठी डोंगरांची पायपीट करतात व प्रसंगी घनदाट जंगलात जाऊन वनौषधींचा शोध घेतात. साप चावण्यासारख्या वनवासी क्षेत्रातील नेहमी येणाऱ्या प्रसंगावर लागणारी वनौषधी शोधण्यासाठी त्यांना अनेकदा सर्पदंशाला सामोरे जावे लागते. मात्र त्यांनी आणि त्यांच्यासारख्या अन्य वनवासी वैदूंनी आपले प्रयत्न मोठ्या नेटाने व  वर्षानुवर्षे सुरुच ठेवले आहेत. मलसिंह पडवी या अन्य वैदूनुसार ते नव्याने फारसे शिकले नाहीत. मात्र वन आणि वनौषधींची जी शिकवण त्यांना परंपरागत स्वरुपात त्यांना वडिलोपार्जित स्वरुपात मिळाली त्याची जपणूक मात्र त्यांनी सतत केली असून त्याचा आज वनवासी गरजुंना लाभ होतो व संबंधित वैदूला मनस्वी समाधान लाभते. हीच बाब या मंडळींसाठी महत्त्वाची ठरते.

पिरॅमलचा हा वनवासी आरोग्य प्रकल्प आज झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आसाम, ओडिशा या सहा राज्यातील वनवासी बहुल क्षेत्रात कार्यरत आहे. फाऊंडेशनचे मुख्याधिकारी आदित्य नटराज नमूद करतात की, या क्षेत्रात वैद्यकीय दृष्ट्या गरजू वनवासींना वैदूंनी केलेल्या निदानाची मुळातून खातरजमा करून त्यांना उपचार देण्याच्या कामी वनवासींचा वैदूंवर व वैदुंचा वैद्यक सेवेवर असणारा विश्वास फार महत्त्वाचा ठरत आहे.

वरील प्रयत्नपूर्वक निर्माण केलेल्या विश्वासामुळेच ऑक्टोबर 2023 मध्ये पिरॅमलने सुरु केलेल्या ‘ट्रायबल हेल्थ कोलॅबोरेटिव्ह’ ला जवळजवळ उपक्रमाच्या सुरुवातीपासूनच यश मिळत गेले. फाऊंडेशनने वैदूंशी संपर्क व वनवासींशी संवाद साधून वनवासी भागात क्षयरोग तपासणीचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले. याचा उपेक्षित परिणाम झाला. वनवासींना पिरॅमल उपक्रमाची व फाऊंडेशनला वनवासींची महत्त्वाची माहिती मिळाली व वैदूंच्या माध्यमातून शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये पाठविण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या 306 वरून चक्क 2266 वर गेली ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये वैदूंचे प्रबोधन व प्रशिक्षण पत्र वितरण यासारख्या पुढाकारांचा सुद्धा सहभाग राहिला.

‘ट्रायबल हेल्थ कोलॅबोरेटिव्ह’तर्फे त्यांच्या वनवासी आरोग्य वर्धनाच्या पुढच्या टप्प्यात अधिक पौष्टिक आहार, माता-बाल संगोपन, शिशु आरोग्य इ. वर लक्ष देण्यात येणार आहे. यासाठी अर्थातच वन आणि वनसंपत्तीची उपलब्धता व उपयोग यावर भर दिला जाईल व त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल. महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातील वन क्षेत्रात कुपोषण व माता-बाल संगोपनाला अधिक प्रभावी करण्यासाठी चालना दिली जाणार आहे.

त्याशिवाय वनवासींच्या वनक्षेत्रात वृक्षलागवडीला प्रोत्साहन देतानाच औषधी गुणयुक्त वृक्ष लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे वन वनवासी व वैदू ही परंपरागत व्यवस्था कायम राखतानाच वनाची सांगड वैद्यकशास्त्र व उपचार व्यवस्थापनाशी घालण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जात आहे.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.