कोकणातील दोन्ही मेडिकल कॉलेजला दंड ! राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचा दणका
रत्नागिरी, सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना 12 लाखांचा दंड; सुधारणेसाठी दोन महिन्यांचा कालावधी
रत्नागिरी पतिनिधी
गेले कित्येक दिवस चर्चेत असलेल्या कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (एनएमसी) दणका दिला आहे. या दोन्ही महाविद्यालयात असलेली शिक्षकांची कमतरता व आवश्यक शैक्षणिक सुविधांच्या अभावामुळे पुढच्या 2 महिन्यात सुधारणा करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. या दोन्ही महाविद्यालयांना पहिल्या टप्प्यात 12 लाखांचा दंड बसवण्यात आला आहे.
कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग ही दोन्ही वैद्यकीय महाविद्यालये आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनत आहेत. रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होवू घातल्या आहेत. मात्र गेल्या वर्षभरात या विद्यार्थ्यांना फक्त 50 टक्के शिक्षकांकडून शिक्षण घ्यावे लागत आहे. तर सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयातही तिसऱया वर्षानंतर शिक्षकांची कमतरता तसेच महाविद्यालयात आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधांचा अभाव हा ही गंभीर विषय ठरत असल्याचे मत शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने आता देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांची काटेकोर पाहणी करण्याचे काम सुरु केले आहे. वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या शैक्षणिक सुविधा, शिक्षणाचा दर्जा आणि या महाविद्यालयांबद्दल वाढत असलेल्या तकारींची गांभिर्याने दखल घेतली आहे. शासनाकडून मोठ्या पमाणात जाहीर करण्यात येत असलेली वैद्यकीय महाविद्यालय, मात्र त्या मानाने असलेली पात्र शिक्षकांची कमतरता आणि त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाची घसरत चाललेला दर्जा, या सर्वच गंभीर गोष्टीची दखल घेत वैद्यकीय परिषदेकडून ही कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परिषदेकडून 12 लाखांचा दंड बसवण्यात आला आहे. तर मुंबई येथील जे. जे. महाविद्यालयालाही 5 लाखांचा दंड बसवण्यात आला आहे. निदान आर्थिक फटका बसल्यावर तरी शासन वैद्यकीय महाविद्यालयातील आवश्यक पात्र शिक्षकांची पदे भरेल. तसेच वैद्यकीय क्षेत्रात चांगल्या दर्जाचे डॉक्टर तयार होतील, असे मत शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.
लवकरच परिस्थितीत सुधारणा होईल
राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडून 11 मे रोजी आकारण्यात आलेल्या 12 लाखांच्या दंडासंदर्भात राज्य शासनाला नुकतेच कळवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या परिस्थितीत सुधारणा होईल. -
डॉ. जयपकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी