स्क्वॅश : अनाहत, अभय, जोश्ना-सेंथिल कुमार यांची पदके निश्चित
वृत्तसंस्था, नागोया : शुक्रवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय स्क्वॅश खेळाडूंनी तीन पदके निश्चित केली. जोश्ना चिनप्पा आणि वेलवन सेंथिलकुमार यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली, तर अनाहत सिंग आणि अभय सिंग यांनी एकेरी प्रकारात अंतिम चारमध्ये स्थान मिळवले.
विक्रमी सातव्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्राया जोशना आणि सेंथिलकुमार यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत फिलिपिन्सच्या डेव्हिड पेलिनो आणि जेमिका अरिबाडो यांच्यावर 11-3, 11-5 असा विजय मिळवून विजयाची सुरुवात केली. कनिष्ठ (ज्युनियर) विश्वविजेती आणि पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या अनाहतने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सहकारी खेळाडू तन्वी खन्नाचा 11-2, 11-5, 11-3 असा सहज पराभव केला आणि ऑलिम्पिकमधील मानाच्या स्थानासाठी आपली वाटचाल कायम राखली. दुसरीकडे, अभयने स्थानिक खेळाडू र्योनोसुके सुकुएचा 11-4, 11-3, 11-6 असा पराभव केला आणि आता उपांत्य फेरीत त्याचा सामना पाकिस्तानच्या इरफान मुहम्मदशी होईल, ज्याने वीर चोत्राणीला हरवले. चोत्राणीने सुरुवातीला एक गेम जिंकून आघाडी घेतली होती, परंतु त्यानंतर त्याला पाकिस्तानी खेळाडूकडून 11-6, 8-11, 3-11, 3-11 असा पराभव स्वीकारावा लागला; हा सामना 41 मिनिटे चालला. पुरुष आणि महिला एकेरीतील सुवर्णपदक विजेते थेट 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील, जिथे स्क्वॅशचा ऑलिम्पिकमध्ये प्रथमच समावेश होणार आहे.
जोश्नाचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील ऐतिहासिक सहावे पदक
जोशना आणि सेंथिलकुमार यांनी उपांत्यपूर्व फेरीत वर्चस्वपूर्ण विजय मिळवण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा कमी वेळ घेतला. शनिवारी होण्राया उपांत्य फेरीत त्यांचा सामना हाँगकाँगच्या यो का ली आणि मिंग हाँग टँग यांच्याशी होईल. 40 वर्षीय जोशनाचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहावे पदक आहे. या स्पर्धेत तिने यापूर्वीच दोन रौप्य आणि तीन कांस्य पदके जिंकली आहेत. तिने 2018 च्या स्पर्धेत एकेरीत कांस्यपदक, 2014 आणि 2018 मध्ये सांघिक रौप्यपदक, तसेच 2010 आणि 2022 मध्ये सांघिक कांस्यपदक जिंकले.
2002 च्या बुसान स्पर्धेपासून सलग सातव्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या जोशनाने, भारताचा आणखी एक दिग्गज स्क्वॉशपटू सौरव घोषाल याचा विक्रम मागे टाकला; घोषालने या खंडीय बहु-क्रीडा स्पर्धेत सहा वेळा सहभाग घेतल्यानंतर गेल्या वर्षी निवृत्ती घेतली होती.