For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यांत्रिकी पद्धतीने भात लागवड केल्यास उत्पादनात वाढ : दादा साईल

यांत्रिकी पद्धतीने भात लागवड केल्यास उत्पादनात वाढ   दादा साईल
Advertisement

कुडाळ | वार्ताहर : शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची आवश्यकता आहे. यांत्रिकी पद्धतीने भात लागवड केल्यास वेळ, मजुरी आणि खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होऊ शकते. आधुनिक शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि फायदेशीर करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती तुकाराम (दादा) साईल यांनी रविवारी तेर्सेबांबर्डे येथे केले.

Advertisement

कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे येथील विठूमाऊली शेतकरी बचत गट व जय देव रामेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी यांत्रिकी पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक तसेच चारा लागवड मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेर्सेबांबर्डे-गावडेवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादा साईल होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली आणि माणगाव जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे उपस्थित होते. दादा साईल यांच्या हस्ते भात लागवड यंत्राचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.कार्यक्रमादरम्यान यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच जनावरांसाठी सकस व दर्जेदार चारा पिकांची लागवड, व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

Advertisement

यावेळी तेर्सेबांबर्डेचे सरपंच रामचंद्र परब, उपसरपंच धनश्री गवस, राज्यस्तरीय शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त शरद धुरी, कृषी सहाय्यक सौरभ भगत, ग्रामपंचायत सदस्या माधवी कानडे, रोहिणी हळदणकर, प्रणाली साटेलकर, सदस्य महेंद्र मेस्त्री, संतोष डीचोलकर, गुणाजी जाधव, अजय डीचोलकर तसेच प्रगतशील शेतकरी गुंडू (बबन) डीचोलकर, गोटू डीचोलकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल विठूमाऊली शेतकरी बचत गट व जय देव रामेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था (तेर्सेबांबर्डे) यांच्या पदाधिकारी व सभासदांचे कौतुक करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.