Kolhapur News: कोल्हापुरात होणार मेकॅनिकल पझल पार्किंग, शहरातली ताण होणार कमी
यामध्ये एकाचवेळी 40 चारचाकी वाहने पार्क करता येणार आहेत
By : इम्रान गवंडी
कोल्हापूर : शहरातील स्टेशन रोडवर नवीन बहुमजली ‘मेकॅनिकल पझल पार्किंग साकारत“ आहे. महापालिकेच्यावतीने याचे काम युद्धपातळीवर सुरू असुन एका महिन्यात हे पझल पार्किंग कार्यान्वित होणार आहे. 4 मजलीचा एक व 5 मजलीचा एक असे दोन टॉवर उभारले जाणार आहेत. यामध्ये एकाचवेळी 40 चारचाकी वाहने पार्क करता येणार आहेत.
कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना याचा लाभ होणार असुन पार्किंगची समस्या सुटण्यास हातभार लागणार आहे. शहरातील वाढती वाहनसंख्या व पर्यटकांचा वाढता ओघ त्यातच महापालिकेची अपुरी पार्किंग व्यवस्था यामुळे पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे.
पार्किंग अड्डे फुल्ल झाले की, वाहने रस्त्याकडेला पार्क केली जातात. त्यामुळे वाहतूकीच्या कोंडीत भर पडते. ‘आधुनिक मेकॅनिकल पझल पार्किंग“ प्रणालीमुळे शहरातील चारचाकी वाहनांच्या पार्किंगवरचा भार हलका होण्यास मदत होणार आहे. नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात. तसेचे दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीतही पर्यटकांची संख्या लक्षणिय असते.
कोल्हापुरात येताच सर्वप्रथम भाविक व पर्यटकांना पार्किंगच्या समस्येला तेंड द्यावे लागते. बाबूजमाल दर्गा येथे बहुमजली पार्किंग अद्यापही कार्यान्वयित झालेले नाही. गेल्या अनेक वर्षापासून याचे काम सुरू असुन नागरिकांना याची प्रतिक्षा लागून राहिलेली आहे. प्रकल्पाची संरचना आणि वैशिष्ट्ये ही एक स्वयंचलित यंत्रणा आहे, यात वाहने एकमेकांवर ढीगारून (पझलप्रमाणे) पार्क केली जातात. यामुळे पारंपरिक पार्किंगपेक्षा 50-60 टक्के जागा वाचते व वाहनांचे सुरक्षित पार्कींग होते.
टॉवर उभारणीचे काम पऊर्ण :
इलेक्ट्रिक काम बाकी सध्या, येथे दोन टॉवर उभारले आहेत. स्लायडिंगचे काम झाल्यानंतर इलेक्ट्रिकचे काम हाती घेण्यात येणार आहे. स्वच्छतागृह व वेटींग रूमही तयार केली जाणार आहे. सदरच्या पझल पार्किंगमुळे कोल्हापुरला एक नवी ओळख मिळणार आहे.
असे आहेत पझल पार्किंगचे फायदे :
जागेची बचत : पारंपरिक पार्किंगमध्ये जागेचा अपव्यय होतो, पण पझल सिस्टममुळे कमी जागेत जास्त वाहने पार्क होतात.
वाहतूक कोंडीला लगाम : अनधिकृत पर्यटक व स्थानिकांना पर्याय उपलब्ध झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल.
पर्यटकांना आधार: नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी व सुट्टीच्या हंगामात येणाऱ्या लाखो पर्यटकांच्या वाहनांसाठी सुरक्षित पार्किंग मिळेल.
सुरक्षा आणि देखभाल: स्वयंचलित यंत्रणेमुळे वाहनांचे नुकसान होण्याचा धोका कमी आहे. सीसीटीव्ही, सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक लॉकिंगामुळे चोरीच्या घटना टाळता येतील.
अशी आहे कार्यप्रणाली : मेकॅनिकल पझल पार्किंग ही एक आधुनिक, स्वयंचलित पार्किंग प्रणाली आहे, जी कमी जागेत जास्तीत जास्त वाहने पार्क करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. ही यंत्रणा ‘पझल“प्रमाणे काम करते, ज्यामध्ये वाहने उभी आणि आडवी अशी हलवून व्यवस्थित लावली जातात. या सिस्टममध्ये मॉड्युलर प्लॅटफॉर्म्स असतात, जे उभ्या आणि आडव्या दिशेने वाहने हलवता येतात. प्लॅटफॉर्म मोटारी, हायड्रॉ लिक्स किंवा इलेक्ट्रिक यंत्रणेद्वारे नियंत्रित केले जातात.
आणखी पझल पार्किंग उभारण्यासाठी प्रयत्नशील
"पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता ग्राऊंड लेवलऐवजी अशा बहुमजली पार्किंगची गरज आहे. हे लक्षात घेवून अशा पद्धतीचे पझल पार्किंग उभारले जात आहे. यातून महापालिकेला उत्पन्न मिळणार असुन पार्किंगचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. अशा पद्धतीचे हुतात्मा पार्क, व्हिनस कॉर्नर येथे आणखी पझल पार्किंग उभारण्याचा विचार आहे."
- रमेश मस्कर, शहर अभियंता, महापालिका
अशी आहे पार्किंग प्रक्रिया
वाहन ठेवणे : चालक वाहनाला पार्किंगच्या प्रवेशद्वारावर आणतो. येथे सेन्सर्स आणि कॅमेरे वाहनाची लांबी, रुंदी व वजन तपासली जाते.
स्वयंचलित यंत्रणा: चालक वाहन ठेवल्यानंतर, सिस्टम स्वयंचलितपणे वाहनाला योग्य पॅलेटवर हलवते. संगणक प्रणाली उपलब्ध जागा शोधते आणि वाहनाला तिथे हलवण्यासाठी पॅलेट्स उभी किंवा आडवी सरकवते.
पझलप्रमाणे व्यवस्था: जसे पझलमधील तुकडे हलवून जागा बनवली जाते, तसेच इतर पॅलेट्स हलवून वाहनासाठी जागा तयार केली जाते. यामुळे एका मर्यादित जागेत जास्त वाहने सामावतात.
असे निघणार वाहन बाहेर : जेव्हा चालकाला वाहन परत हवे असते, तेव्हा तो एका डिजिटल किऑस्कवर किंवा अॅपद्वारे विनंती करतो. केवळ पार्किंगचा नंबर टाकल्यास सिस्टम आपोआप त्या वाहनाचा पॅलेट शोधते आणि इतर पॅलेट्स हलवून वाहनाला प्रवेशद्वारापर्यंत आणते. ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होते, ज्यामुळे वेळेची बचत होते.