मराठी शाळेत शिकून मोठे झालो तर ते फार अभिमानाचे !
मेकॅनिकल इंजिनियर सचिन सावंत यांचे प्रतिपादन ; कुणकेरी विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
सावंतवाडी । प्रतिनिधी
आपण आपल्या गावच्या मराठी शाळेत शिकलो आणि मोठे झालो तर ते फार अभिमानाचे आहे. आज एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्याला यश मिळवायचे असेल आणि शासकीय सेवेत उच्च पदावर जर आपल्याला जायचे असेल तर निश्चितपणे गावची शाळाच महत्त्वाची आहे . या शाळेचा अभिमान आपल्याला आपण पुढील जीवनात प्रवेश करू तेव्हाच खऱ्या अर्थाने वाटेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिकून काय व्हायला हवे हे आत्ताच मनाशी बाळगा. आंबेगाव, कुणकेरी या गावातील विद्यार्थ्यांनी आपल्या गावच्या माध्यमिक व प्राथमिक शाळेतच शिकायला हवे तरच तुम्ही अभिमानाने सांगू शकाल की तुम्ही गावच्या शाळेत शिकून मोठे झालात असे प्रतिपादन मेकॅनिकल इंजिनियर सचिन सावंत यांनी यावेळी केले . कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे तसेच माजी विद्यार्थी म्हणून ते बोलत होते . अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ठेकेदार दीपक सांगेलकर,लोकसेवा संघ संस्थेचे सचिव उत्तम सराफदार, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष राजन मडवळ,शाळा समिती सदस्य, शांताराम परब , माजी मुख्याध्यापक विठ्ठल कदम , भरत सराफदार, सखाराम कुंभार, एन घाटकर,अनंत सावंत मुख्याध्यापक सौ अर्चना सावंत , सुनील सावंत आधी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी अध्यक्षा स्थानावरून बोलताना सामाजिक कार्यकर्ते दीपक सांगेलकर यांनी विद्यार्थ्यांनी असेच यश संपादन करावे आणि तुमच्या आयुष्याची दिशा निश्चित करा आणि मोठे व्हा असा मोलाचा सल्ला दिला. यावेळी शाळेच्या वतीने सचिन सावंत व दीपक सांगेलकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सचिव उत्तम सराफदार यांनी सत्कार केला. यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनी आज गावातील मराठी शाळा विद्यार्थी पटसंख्या अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत . खरंतर आपल्या गावातील मराठी शाळा हा गावच्या विकासाचे एक केंद्र आहे . गावच्या शाळेत तुम्हाला मुक्तपणे शिक्षणाचे धडे गिरवता येतात त्यातून तुम्ही पुढील काळात एक उत्तम आदर्श सुसंस्कृत व्यक्ती म्हणून तुमची गणना होते. या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाबरोबर आम्ही क्रीडा ,सांस्कृतिक ,सामाजिक ,अध्यात्मिक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान देत आहोत . पालक व आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळा अधिक प्रगत करण्यासाठी सहकार्य करीत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रेया मेस्त्री , अनुष्का सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी आर्या सावंत ,विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कोकरे ,शिक्षक श्री राऊळ,मिथिलेश राणे श्रीम. सावंत. श्री गोसावी आदी उपस्थित होते.