ऑस्ट्रेलियन संघात मॅकस्वेनीचे पुनरागमन
वृत्तसंस्था/मेलबोर्न
लंकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन कसोटी क्रिकेट संघामध्ये नाथन मॅक्सवेनीचे पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा लंकेचा हा दौरा तीन आठवड्यांचा आहे. उभय संघामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. गेल्या आठवड्यात भारताविरुद्धची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने 3-1 अशा फरकाने जिंकून गावसकर बॉर्डर चषक बऱ्याच वर्षानंतर पटकाविला. या मालिकेत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातील काही खेळाडूंना लंकन दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली असून काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व पॅटकमिन्सच्या जागी आता स्टीव्ह स्मिथकडे सोपविण्यात आले आहे. ऑस्टेलियन संघामध्ये 21 वर्षीय कुपर कोनोली या नव्या चेहऱ्याचा समावेश करण्यात आला आहे.
या दौऱ्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियने 16 खेळाडूंचा संघ जाहीर केला असून कोनोली हा डावखुरा फिरकी गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज आहे. टॉड मर्फी आणि मॅथ्यु कुहेनीमन हे ऑस्ट्रेलियन संघातील फिरकी गोलंदाज आहेत. भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात मॅक्सवेनीने 72 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या दोन कसोटीसाठी मॅक्सवेनीला वगळून सॅम कोनस्टासला खेळविण्यात आले होते. या दौऱ्यासाठी मिचेल मार्शला वगळण्यात आले आहे. या मालिकेमध्ये हॅजलवूड खेळणार नाही. ऑस्ट्रेलिया आणि लंका यांच्यातील पहिली कसोटी गॅलेमध्ये 29 जानेवारीला तर दुसरी कसोटी 6 फेब्रुवारीला गॅले येथे होणार आहे. या कसोटी मालिकेनंतर उभय संघात एकमेव वनडे सामना 13 फेब्रुवारीला गॅलेच्या मैदानावर खेळविला जाईल.
ऑस्ट्रेलिया संघ: स्टिव स्मिथ (कर्णधार), अॅबॉट, बोलॅन्ड, कॅरे,कोनोली, ट्रेव्हिस हेड, इंग्लीस, उस्मान ख्वॉजा, कोनस्टास, कुहेनमन, लाबुशेन, लियॉन, मॅक्सवेनी, मर्फी, स्टार्क आणि वेबस्टर