वाल्मिक कराडवर मकोका
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : खंडणी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड / प्रतिनिधी
बीड जिह्यातील केज न्यायालयाने खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडबाबत मंगळवारी महत्वाचा निर्णय दिला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. यामुळे आता कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे. यामध्ये कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. खंडणी प्रकरणाबाबात वाल्मिक कराडला मंगळवारी बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
दरम्यान, खंडीणीबाबत वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत संपली आहे. त्यानंतर मंगळवारी केज न्यायालयात वाल्मिक कराडला हजर करण्यात आले होते. त्यावेळी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. तसेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
कोर्टात नेमकं काय झालं?
मंगळवारी न्यायालयात सुनावणीला सुरुवात होताच तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडची दहा दिवसांची पोलीस कस्टडी मागितली होती. व्हाईस सॅम्पल घेतला गेला आहे. तीन मोबाईल कराड यांचे जप्त केले आहेत. संपत्ती कोणत्या गुह्यातून कमावली आहे का हे तपासायचे म्हणून पीसीआर हवा आहे, असे तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले. भारतात अथवा भारताबाहेर काही संपत्ती आहे का?, याचा तपास करायचा असल्याचेही तपास अधिकारी गुजर यांनी म्हटले होते.
वाल्मिक कराडच्या वकीलाचाही जोरदार युक्तीवाद
वाल्मिक कराडच्या वकिलाने देखील कोर्टात जोरदार युक्तिवाद केला आहे. वाल्मि कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले की, 15 दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसाच्या ताब्यात आहे. आणखी कोणता तपास बाकी आहे. बँक खात्याची चौकशी करणाऱ्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यासाठी आरोपीची गरज नाही. यापूर्वीचे त्यांच्याविरोधातले 14 गुन्हे नील झाले आहेत. मग त्या गुह्यांचा तपास का करायचा आहे?, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती, तर मग दोन्ही आरोपी 10 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे मग तेव्हा का नाही केली? हा सगळा तपास 15 दिवसांपूर्वी करणार होतात. मग 15 दिवसांत काय तपास केला? असा युक्तिवाद वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी केला.
सर्व आरोपींना 302 आणि मकोकामध्ये घ्यावे : धनंजय देशमुखांची मागणी
वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. आता यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय देशमुख म्हणाले की, या हत्याकांडातील जे आरोपी आहेत मग ते कोणी पण असो, त्या सगळ्यांना 302 आणि मकोकामध्ये घेण्यात यावे , अशी आमची प्रमुख मागणी आहे.
वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचे परळीत आंदोलन
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. मात्र मंगळवारी खंडणीच्या गुह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी आंदोलन केले. परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले. भाजप आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात कराड समर्थकांनी आंदोलन सुरू केले आहे. वाल्मिक कराडच्या मातोश्री देखील आता मैदानात उतरल्या आहेत. लेकाच्या न्यायासाठी वाल्मिक कराडच्या मातोश्रींनी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली.
14 ते 28 जमावबंदी
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बीड जिह्यात 14 ते 28 जानेवारीपर्यंत जमावबंदी राहणार आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून हे आदेश लागू असणार आहेत. त्यानुसार जिह्यात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे करण्यासाठी जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत.
वाल्मिक कराडला आज न्यायालयात हजर करणार
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडला आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतले आहे. त्याची परवानगी एसआयटीने मिळवली होती. या प्रकरणी एसआयटीकडून कराडला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला आता हत्येच्या प्रकरणात किती दिवसांची कोठडी मिळते हे पाहावे लागणार आहे.