‘एमसीजी’ने मोडला 87 वर्षे जुना विक्रम
वृत्तसंस्था/ मेलबर्न
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात सोमवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावरील प्रेक्षकांच्या उपस्थितीचा विक्रम मोडला गेला. या कसोटीतील एकूण उपस्थिती अभूतपूर्व 3 लाख 50 हजार 700 वर पोहोचली. 1937 च्या अॅशेसमध्ये महान डॉन ब्रॅडमन आपल्या शिखरावर असताना एकूण उपस्थितीने 3 लाख 50 हजार 535 चा उच्चांक नोंदवला होता. हा उच्चांक सोमवारी उपाहाराच्या वेळी 51,371 प्रेक्षकांची उपस्थिती राहून मोडला गेला.
पाचव्या दिवशी उपाहारानंतर भारताने 340 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली तेव्हा ही संख्या 60,000 पेक्षा जास्त झाली. ‘पाचव्या दिवशीची सध्याची उपस्थिती 51,371 आहे. एकूण 3 लाख 50 हजार 700 उपस्थिती ही एमसीजीवरील कोणत्याही कसोटी सामन्याचा विचार करता सर्वाधिक आहे. ती 1937 मध्ये झालेल्या इंग्लंडविऊद्धच्या 6 दिवसांच्या कसोटी सामन्यातील 3 लाख 50 हजार 534 या एकूण उपस्थितीपेक्षा जास्त आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले आहे.
1999 मध्ये ईडन गार्डन्सवर झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतरचा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेला दुसरा कसोटी सामना ठरला आहे. त्यावेळी एकूण 4.65 लाख लोक उपस्थित होते. सोमवारी सामन्याच्या सर्व तिकिटांची किंमत 10 ऑस्ट्रेलियन डॉलर्स होती.