गुजरातमध्ये रॅगिंगमुळे एमबीबीएस विद्यार्थ्याचा मृत्यू
15 विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा नोंद
वृत्तसंस्था/ पाटन
गुजरातच्या पाटन येथे एका वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगमुळे 18 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 15 विद्यार्थ्यांच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे. सर्व आरोपी हे एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत. पीडित समवेत अनेक कनिष्ठ विद्याथ्यांना हॉस्टेलमध्ये तीन तासांपर्यंत उभे करून ठेवण्यात आले होते. तीन तासांपर्यंत उभे राहिल्यावर एक विद्यार्थी बेशुद्ध झाला आणि त्याला रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हार्दिक शाह यांनी सांगितले आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव अनिल मेठानिया आहे. तो एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी महाविद्यालयाच्या रॅगिंगविरोधी समितीने चौकशी केली आहे. या चौकशीत द्वितीय वर्षाच्या 15 विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याचे आढळून आले. बालिसाना पोलीस स्थानकात सोमवारी नोंदविण्यात आलेल्या एफआयआरनुसार 11 विद्यार्थ्यांना शनिवारी रात्री हॉस्टेलच्या खोलीत बोलाविण्यात आले होते. यादरम्यान कनिष्ठ विद्यार्थ्यांना तीन तासांपर्यंत उभे करून ठेवण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर नृत्य करण्याचा आणि गाणे गाण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.
सीनियर विद्यार्थ्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याने अनिलची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध पडला होता. मध्यरात्री त्याला रुग्णालयात हलविण्यात आले, जेथे त्याचा मृत्यू झाला.