कलावंत सन्मान योजना जिल्हास्तरीय समितीवर मयूर गवळींची निवड
ओटवणे प्रतिनिधी
कारिवडे गवळीवाडी येथील दशावतारातील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक तसेच भाव अंतरीचे हळवे दशावतारी लंगार फेम महेंद्र उर्फ मयुर एकनाथ गवळी यांची राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजना जिल्हास्तरीय समितीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार व जिल्हा भाजपा सरचिटणीस महेश सारंग यांच्या प्रयत्नाने निवड करण्यात आली आहे..राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत जेष्ठ साहित्यिक आणि कलावंत यांना आर्थिक सहाय्य आणि सन्मान दिला जातो. साहित्य, नाट्य, भजन संगीत, वारकरी संप्रदाय, लोककला इत्यादी क्षेत्रांत दीर्घकाळ योगदान दिलेल्या जेष्ठ कलाकार व साहित्यिकांना आर्थिक मदत दिली जाते. या समितीवर मयूर गवळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.या मानधन योजनेसाठी साहित्य किंवा कला क्षेत्रात १५ वर्षे काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक असून ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वय आणि ६०००० पेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असलेले कलाकार पात्र ठरणार आहेत. पात्र कलाकारांनी या योजनेच्या लाभासाठी साहित्यिक व कलावंत मानधन योजना समिती सदस्य महेंद्र उर्फ मयुर एकनाथ गवळी यांच्या ८४११८६२५८० या मोबाईलवर संपर्क साधावा.