महापौर’ श्वान
निवडणूक हा गणतंत्रीय राज्यपद्धतीचा प्राण आहे. त्यामुळे प्रत्येक गणतंत्रीय राष्ट्रामध्ये निवडणुका होतच असतात. निवडणूक ही मानवाची, मानवासाठी आणि मानवाकडून होणारी प्रक्रिया असते. कारण, अन्य जैव प्रजातींमध्ये ती तशा प्रकारे होत नाही, जशी गणतंत्रीय देशांमधील मानवांमध्ये होते. तथापि, प्रत्येक नियमाला अपवाद असतोच. तसा या नियमालाही असणारा आश्चर्यकारक अपवाद समोर आला आहे. या जगाच्या पाठीवर एक महानगर असे आहे, की जेथील मानवी जनतेने एका मानवाची नव्हे, तर एका श्वानाची निवड या महानगराचा महापौर म्हणून केली आहे. हे महानगर दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या देशात नसून चक्क अमेरिकेत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया या सर्वात श्रीमंत प्रांतात हे नगर आहे.
लौकिक अर्थाने ते महानगर म्हणता येणार नाही. तर ही कॅलिफोर्नियाच्या डोंगराळ भागात असणारी इडलविल्ड नामक एक मानववस्ती आहे. या ‘महानगरा’चे महापौरपद गेली चौदा वर्षे एका ‘गोल्डन रिट्रीव्हर’ प्रकारच्या श्वानाकडे आहे. या श्वानाने 2012 मध्ये प्रथम महापौरपदाची निवडणूक जिंकली होती. हा महापौर श्वान ‘महापौर मॅक्स प्रथम’ या उपाधीने परिचित आहे. या शहरात महापौर निवडण्याची पद्धतही जगावेगळी आहे. येथे कोणताही राजकीय पक्ष नाही. कोणताही भ्रष्टाचार नाही. न्यायलयीन प्रकरणेही नाहीत. श्वानाची निवड महापौरपदी करण्यासाठी या महानगरातील लोक धन दान करतात. हा श्वान केवळ नावाचा महापौर नाही. तर तो चांगलाच सक्रीय असतो. तो महापौराची विशिष्ट वेषभूषा करुन फेरफटका करतो. पर्यटकांचे स्वागत करतो. बहुतेक पर्यटक त्याला पाहण्यासाठीच येतात. सर्वात धक्कादायक घटना अशी की या महापौर श्वानाचा आता मृत्यू झाला आहे. तरीही, तोच महापौर मानला जातो. आता त्याचे काम त्याचाच वंशज श्वान (महापौर मॅक्स द्वितीय) त्याच्या वतीने करत असतो.