महापौर-उपमहापौर निवडणूक 15 मार्चला
प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून निवडणूक वेळापत्रक जाहीर
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या 23 व्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचे वेळापत्रक अखेर प्रादेशिक आयुक्तांनी बुधवार दि. 5 मार्च रोजी जाहीर केल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 15 मार्च रोजी निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली असून प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून यासंबंधीचा प्रस्ताव दुपारी महापालिकेच्या कौन्सिल विभागाला पाठविण्यात आला. त्यानंतर लागलीच नगरसेवकांना निवडणुकीसंदर्भात नोटीस पाठविण्यात आली आहे. विद्यमान महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांचा कार्यकाळ 14 फेब्रुवारी रोजी संपला असून गेल्या महिन्याभरापासून ते काळजीवाहू महापौर म्हणून कामकाज पहात आहेत. महापौरपद सामान्यवर्गासाठी तर उपमहापौरपद सामान्य महिलावर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र कार्यकाळ संपून महिना उलटला तरी प्रादेशिक आयुक्तांकडून निवडणूक तारीख निश्चित करण्यात आली नव्हती. त्यामुळे कौन्सिल विभागाकडून निवडणूक घेण्यासंदर्भात प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
त्यातच खाऊकट्टा प्रकरणी सत्ताधारी गटातील नगरसेवक जयंत जाधव व मंगेश पवार यांचे सदस्यत्व प्रादेशिक आयुक्तांनी रद्द केले. त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भात कौन्सिल विभागाकडून फेरप्रस्ताव पाठविण्यात आला होता. तरीदेखील निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली नाही. शनिवार दि. 1 मार्च रोजी अर्थसंकल्पीय बैठकीत तत्कालिन कौन्सिल सेक्रेटरी गीता कौलगी यांनी दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाल्याची माहिती सभागृहाला दिली. त्यानंतर त्याचदिवशी मनपा आयुक्त शुभा बी. यांनी आपल्या सहीनिशी महापौर व उपमहापौर निवडणुकीचा फेरप्रस्ताव प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे पाठविला होता. सदर प्रस्ताव पोहोचल्यानंतर प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टण्णवर यांनी मंजुरी दिली. त्यानुसार निवडणुकीचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. 15 मार्च रोजी निवडणूक होणार असून दुपारी 1 वाजता मतदान होणार आहे. महापालिकेत एकूण 58 लोकनियुक्त नगरसेवक होते. त्यापैकी जयंत जाधव व मंगेश पवार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही. 56 नगरसेवक व 7 पदसिद्ध सदस्य असे एकूण 63 जण या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
प्रियांका विनायक नूतन कौन्सिल सेक्रेटरी
महापालिकेच्या कौन्सिल सेक्रेटरी गीता कौलगी यांची ऐन महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या तोंडावर बदली झाली आहे. निवडणुकीसाठी पूर्णवेळ कौन्सिल सेक्रेटरी असणे आवश्यक असल्याने मनपा आयुक्त शुभा बी. यांनी कार्यालयातील साहाय्यक (महसूल) प्रियांका चंद्रकांत विनायक यांची कौन्सिल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली आहे. तसा आदेश त्यांनी आपल्या सहीनिशी जारी केला आहे.
मतदार असे...
- नगरसेवक-56
- खासदार-02
- आमदार-04
- विधानपरिषद सदस्य-01
एकूण मतदार-63