शहरातील विविध समस्यांची महापौर-उपमहापौरांकडून पाहणी
खंजर गल्ली, कोनवाळ गल्ली, महात्मा फुले रोडला दिली भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत नगरसेवकांनी विविध समस्या मांडल्याने त्याची दखल घेत सोमवारी महापौर, उपमहापौर व मनपा अधिकाऱ्यांनी शहरात फेरफटका मारून समस्यांची पाहणी केली. विशेषकरून खंजर गल्ली येथील लक्ष्मी मार्केटची जागा, महात्मा फुले रोडवरील गटारी आणि कोनवाळ गल्लीतील नाल्याची पाहणी करून त्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली.
महापालिकेच्या मालकीची खंजर गल्ली येथे लक्ष्मी मार्केटची 5 एकर जागा आहे. जागेभोवती संरक्षण भिंत बांधण्यात आली असली तरी जागेचा योग्य वापर होत नसल्याने त्या ठिकाणी जुगार व मटका खेळला जात आहे. यामुळे आपली बदनामी होत असून मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेत एखादे व्यापारी आस्थापन बांधण्यात यावे, अशी मागणी विरोधी गटनेते मुजम्मिल डोणी यांनी शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत केली होती. त्यामुळे व्यापार संकुल उभारण्यासंदर्भात आराखडा तयार करण्याची सूचनाही अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांना करण्यात आली होती.
त्याचबरोबर नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी आपल्या प्रभागात येणाऱ्या महात्मा फुले रोडवरील गटारी तुंबल्या असल्याने सांडपाणी वाहून जाणे कठीण झाले आहे. गटारीवर घालण्यात आलेल्या स्लॅबमुळे गटारींची स्वच्छता करणे कठीण जात आहे. त्यामुळे याकडे महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर कोनवाळ गल्लीतील नाल्याबाबतही बैठकीत तक्रार करण्यात आली होती. कोनवाळ गल्लीचा नाला धोकादायक बनला असून तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी महापालिका घेणार का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार राजू सेठ यांनी आपल्या निधीतून नाल्याचे काम केले जाईल, असे सांगितले होते.
एकंदरीत शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीनंतर सोमवारी तातडीने महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी तातडीने खंजर गल्लीतील लक्ष्मी मार्केट, महात्मा फुले रोडवरील गटारी आणि कोनवाळ गल्लीतील नाल्याची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. यावर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली.