For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बैठकीला महापौरांची दांडी

12:36 PM Feb 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
बैठकीला महापौरांची दांडी
Advertisement

पद्मश्री लिबिया सरदेसाईंसह नागरिक संतप्त : दुपारी दोन वाजेपर्यंत मनपातच मांडले ठाण ; वाल्मिकींना पोलिसांनी उचलून काढले बाहेर

Advertisement

पणजी : महापौरांनीच बैठक बोलावली आणि ऐनवेळी त्यांनीच दांडी मारली आणि त्यांचा संदेश घेऊन आयुक्त उपस्थित नागरिकांसमोर आले आणि बैठक रद्द झाल्याचे सांगू लागले. संतप्त नागरिकांनी, ज्यांनी बैठक बोलावली त्यांनीच आमच्यासमोर येऊन उत्तर द्यावे, असे त्यांना सुनावले. त्यावरून वाद निर्माण झाला. अचानक पोलिस दाखल झाले आणि ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांना बाहेर जाण्यास सांगू लागले. तेव्हा सर्वजण संतप्त बनले व त्यातून मोठा तणाव निर्माण झाला.

मांडवीतील विद्यमान एक कॅसिनो बदलून त्याजागी नवा महाकाय 

Advertisement

कॅसिनो आणण्यात येणार असल्याचे वृत्त समजल्यानंतर राज्यातील आणि खास करून पणजीतील समविचारी ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन त्यास विरोध करण्यास प्रारंभ केला आहे. त्याची पहिली प्रक्रिया म्हणून आधी त्यांनी मनपास निवेदन दिले आहे. त्यावेळी स्वत: महापौरांनी त्यांना दि. 12 फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन याविषयी सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते.

बैठकीची वेळ गेली टळून

त्यानुसार काल गुरुवारी 12 रोजी सकाळी 11 वाजता स्वातंत्र्यसैनिक पद्मश्री लिबिया लोबो सरदेसाई यांच्यासह पणजीतील अनेक नागरिक मनपा सभागृहात उपस्थित झाले होते. त्यात आप प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक हेही समर्थकांसह उपस्थित होते. परंतु नियोजित वेळ टळून गेली तरी महापौर रोहित मोन्सेरात बैठकीस येत नसल्याचे पाहून उपस्थितांमध्ये चुळबूळ सुरू झाली.

बैठक रद्द झालीच कशी?

त्यानंतर काही वेळाने आयुक्त ग्लेन मदेरा हे सभागृहात आले. त्यांनी आज कोणत्याही बैठकीचे नियोजन नसल्याचे सांगितले. ते ऐकून अचंबित झालेल्या उपस्थितांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. स्वत: महापौरांनीच आम्हाला बैठकीसाठी बोलावले असताना तुम्ही हा संदेश कसा घेऊन आलात? असा प्रतिप्रश्न केला. बैठक रद्द झालेली असेल तर स्वत: महापौरांनीच येऊन आम्हाला सांगावे, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा इशारा दिला.

कॅसिनोंमुळे अनेक समस्यांचा त्रास

यावेळी बोलताना नाईक यांनी मांडवीतील विद्यमान कॅसिनोंमुळे पणजी शहरावर होत असलेल्या परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही बैठकीस आलेलो आहोत, असे सांगितले. त्यात आता नवीन महाकाय कॅसिनोची भर पडल्यास परिस्थिती अधिकच बिघडेल, कायदा सुवव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील, वाहतूक कोंडी वाढेल, पर्यावरण धोके आणि स्थानिकांना त्रास होतील, असे नाईक यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.

पोलिसंच्या कारवाईने तणाव

परंतु नाईक यांचे बोलणे म्हणजे बैठकीत व्यत्यय येत असल्याचे कारण देत पोलिसांनी नाईक यांना सभागृहातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. त्यास त्यांनी विरोध केला असता पोलिसांनी त्यांना उचलून सभागृहाबाहेर नेले. या कारवाईमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. हा प्रकार पाहून संतप्त बनलेल्या लिबिया लोबो सरदेसाई यांनी, अशाप्रकारे एका चांगल्या उद्देशासाठी एकत्र आलेल्या नागरिकांवर कारवाई करण्याच्या कृतीचा निषेध केला. हा प्रकार अलोकशाही असल्याचा आरोप त्यांनी केला. कॅसिनोंमुळे मांडवी प्रदूषित होत असून ‘आम्हाला मासे खायचे आहेत, कॅसिनोची घाण नव्हे’ असे ठणकावून सांगितले.

कॅसिनोमुळे नदीकाठचे पर्यावरण, उपजीविका आणि गोव्याच्या सांस्कृतिक रचनेला धोका निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला. यासंबंधी मनपाला निवेदन दिले असून सदर कॅसिनोला विरोध करण्याचे आवाहन केले आहे, असेही त्यांनी सांगितले. या नागरिकांनी दुपारी दोन वाजेपर्यंत मनपा कार्यालयातच ठाण मांडले. मात्र महापौर काही त्यांच्यासमोर उपस्थित झाले नाही. काही वेळेनंतर त्यांनी सरदेसाई यांना मोबाईलवर संदेश पाठवून अपरिहार्य कारणास्तव आपण बैठकीस उपस्थित शकलो नसल्याचे सांगितले. तसेच त्यासाठी दिलगिरीही व्यक्त केली. त्यानंतर उपस्थित सर्व नागरिक तेथून निघून गेले. बैठकीवेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे अन्य कोणतीही विपरित घटना घडली नाही.

पेलिसांच्या मदतीने भाजपची दडपशाही : आप

आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांना मनपात देण्यात आलेल्या वागणुकीचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. विद्यमान भाजप सरकार हे कॅसिनो मालकांच्या दावणीला बांधलेले स्वाभिमनशून्य सरकार असल्याचे पक्षाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. आम्ही केवळ कॅसिनोंना विरोध करण्यासाठी शिष्टमंडळासोबत मनपात गेलो होतो. हुल्लडबाजी, गुंडगिरी करण्यासाठी नव्हे. त्यामुळे अशाप्रकारे भर सभेतून एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांच्या मदतीने उचलून बाहेर काढण्याएवढा कोणताही गुन्हा केलेला नव्हता. सार्वजनिक बैठकीदरम्यान पोलिसांकडून झालेली कारवाई ही जाणीवपूर्वक होती. म्हणूनच पोलिसांनी आपणाशी गैरवर्तन केले आणि बैठकीतून बाहेर काढले. ही कृती म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, असा दावा नाईक यांनी केला आहे.

 

Advertisement
Tags :

.