For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मायावती आणखी 5 वर्षे बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा

06:45 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
मायावती आणखी 5 वर्षे बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा
Mayawati as National President of BSP for another 5 years
Advertisement

आकाश आनंद 4 राज्यांचे निवडणूक प्रभारी

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

मायावती यांची पुन्हा एकदा बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढील 5 वर्षे म्हणजे 2029 पर्यंत त्या पक्षाच्या प्रमुख राहतील. मायावतींचे भाचे आकाश आनंद यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांना चार राज्यांमध्ये निवडणूक प्रभारी बनवण्यात आले आहे. राष्ट्रीय समन्वयकासोबतच आकाश आनंद यांच्याकडे हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मायावती यांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या कल्याणकारी तत्त्वावर आम्ही संघर्ष सुरूच ठेवू, असा नारा दिला.

Advertisement

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश मिश्रा यांनी 68 वषीय मायावती यांना सहाव्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव मांडला. यानंतर देशभरातील बसपाचे पदाधिकारी, बैठकीला उपस्थित राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांनी एकमताने मायावती यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली. मायावती 2003 पासून सतत या पदावर आहेत. यासोबतच बसपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आकाश आनंद यांचाही दर्जा वाढवण्यात आला.

पक्षाच्या बैठकीत झालेल्या निवड प्रक्रियेनंतर संघटनेची ताकद आणि व्होट बँक वाढविण्यासह विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. मायावतींनी सभेत निवडणुका जिंकण्याचा मूळ मंत्र दिला. एक दिवसापूर्वी मायावती सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली होती. याला अफवा म्हणत मायावतींनी राजकारणातून तात्काळ निवृत्ती घेण्यास नकार दिला होता. आता पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष बनून त्यांनी या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

Advertisement
Tags :

.