मायावतींनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, पुतण्या आकाश आनंद सांभाळणार पक्षाची धुरा
बहुजन समाज पक्षाच्या (BSP) सुप्रीमो मायावती यांनी त्यांच्या उत्तराधिकारी जाहीर केला आहे. मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा पुतण्या आकाश आनंद हे आता पक्ष सांभाळणार आहेत. बसपाच्या बैठकीत मायावती यांनी अशी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकी पूर्वी मायावती यांच्या या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मायावती यांनी आज रविवारी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आणि सर्व राज्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. आकाश आनंदसोबत मायावती या बैठकीला पोहचल्या. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, या बैठकीत मायावतींनी आपला उत्तराधिकारी म्हणून आकाश आनंद यांचे नाव जाहीर केले.मायावतींच्या या घोषणेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कोण आहे आकाश आनंद?
आकाश आनंद हे बसपा प्रमुख मायावती यांचे लहान भाऊ आनंद कुमार यांचा मुलगा आहे. आकाशचे शालेय शिक्षण गुरुग्राममधून झाले. आकाश यांनी पुढील शिक्षण लंडनमध्ये केले. त्यांनी लंडनमधून एमबीए केले आहे. २०१७ पासून ते पक्षात सक्रिय आहेत. यंदा ते मायावतींसोबत मोठ्या सभेत मंचावर दिसले. यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्याविषयी चर्चा सुरू झाली.