मायावतींचा आनंद कुमार यांनाही दणका
राष्ट्रीय समन्वयक पदावर अन्य नेत्याची नियुक्ती
वृत्तसंस्था/ लखनौ
बसप सर्वेसर्वा मायावती यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. मायावतींनी दोन दिवसांपूर्वी स्वत:चा बंधू आनंद कुमार यांना पक्षाचा राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त केले होते. आता त्यांनी आनंद कुमार यांना या पदावरून हटविले आहे. आनंद कुमार यांच्या जागी रणधीर बेनीवाल यांना राष्ट्रीय समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली आहे. आनंद कुमार हे यापूर्वी बसपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते आणि ते या पदावर कायम राहतील.
दीर्घ काळापासून निस्वार्थ सेवा आणि समर्पणासोबत कार्यरत बसपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद कुमार यांना अलिकडेच राष्ट्रीय समन्वयक म्हणून नेमण्यात आले होते, परंतु पक्ष अन् चळवळीचे हित विचारात घेत आनंद कुमार यांनी एकाच पदावर कार्यरत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या इच्छेचे आम्ही स्वागत करतो. अशास्थितीत आनंद कुमार हे पूर्वीप्रमाणेच पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहत माझ्या थेट दिशानिर्देशनात पूर्वीप्रमाणेच स्वत:च्या जबाबदारया पार पाडतील. त्यांच्या जगी रणधीर बेनीवाल यांना राष्ट्रीय समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मायावती यांनी सांगितले.
रामजी गौतम आणि रणधीर बेनीवाल हे दोघेही बसप राष्ट्रीय समन्वयक म्हणून थेट माझ्या नेतृत्वाखाली विविध राज्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत. हे दोन्ही नेते पूर्ण प्रामाणिकपणे अन् निष्ठेने कार्य करतील अशी पक्षाला अपेक्षा असल्याचे मायावती म्हणाल्या.
भाच्याची पक्षातून हकालपट्टी
मायावती यांनी दोन दिवसांपूर्वी भाचा आकाश आनंद याची बसपमधून हकालपट्टी केली होती. आकाश आनंद हे त्यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या जागी मायावती यांनी स्वत:चा बंधू आनंद कुमार यांना ही जबाबदारी सोपविली होती. याचबरोबर रामजी गौतम यांनाही राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.