For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मायानदी

06:48 AM Jul 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
मायानदी
Advertisement

भगवंत म्हणाले, त्रिगुणांच्या प्रभावाच्या मोहात माणसे इतकी अडकतात की, त्यापुढे त्यांना माझाही विसर पडतो. मी तयार केलेली त्रिगुणात्मक माया एखाद्या पडद्याप्रमाणे माझ्या आड येऊन मला झाकून टाकते. म्हणून प्राणी मला जाणत नाहीत. ज्याप्रमाणे मोती हे पाण्यापासून तयार होतात पण पाण्यात विरघळत नाहीत त्याप्रमाणे मी तयार केलेले प्राणी माझ्याशी एकरूप होत नाहीत. मी निर्माण केलेली माया माझ्यावर कुरघोडी करायच्या प्रयत्नात असते मग ती माणसांना कसली दाद देणार? पण तिच्यावर माझे नियंत्रण असल्याने मायारूपी नदीतून तरुन जाण्यासाठी मला शरण येणे हाच राजमार्ग आहे. काही माणसे स्वबळावर ह्या मायेच्या प्रवाहातून पोहून पलीकडे जाऊ अशा आत्मविश्वासाने तसा प्रयत्न करतात पण प्रत्यक्षात त्यांची कशी ससेहोलपट होते ते पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. ते म्हणतात, माझी त्रिगुणात्मिका दैवी माया तरून जाणे दुस्तर आहे. जे मला शरण येतात तेच ही माया तरून जातात.

Advertisement

माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा । कासेस लागले माझ्या ते चि जाती तरूनिया ।।14।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी सांगितले की, हे सर्व विश्व मीच व्यापलेलं असल्याने हे सर्व प्राणी हे माझ्या देहाचेच अवयव आहेत पण मायेमुळे ते जीवदशेस आले आहेत आणि माझ्यापासून विलग झाले आहेत. आता ते माझ्या शरीराचा भाग राहिलेले नाहीत. विशेष म्हणजे ते माझ्या शरीरापासून जरी तयार झालेले असले तरी मला ओळखत नाहीत. त्यांच्या स्वरूपाला मायेने वेढलेले असल्याने ते मी आणि माझेपणा या भ्रांतीने विषयांध झाले आहेत. मायेने त्यांना माझ्यापासून विलग केलेले असून त्यांच्यात आणि माझ्यात ती ठामपणे उभी आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांना दिसू शकत नाही. ज्यांनी हे ओळखलेले आहे ते मला भेटण्यासाठी आसुसलेले असतात. त्यासाठी त्यांना त्यांच्या माझ्यामध्ये दुथडी भरून वहात असलेली माया नदी पार करून माझ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. हे कसे साध्य करायचे हे समजून घेण्यापूर्वी मायानदीची सविस्तर माहिती अर्जुना तुला सांगतो. ही मायानदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून उगम पावते. तेथून ती उसळी मारून पुढे जायला निघते. निघाल्याबरोबर, तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडाबुडा येतो. पुढे सृष्टीचा विस्तार जसजसा वाढत जातो तसतशी ती पुढे जात राहते. काळालाही न जुमानणाऱ्या शक्ती तिच्यात असल्याने ती वेगाने वाढून वहात असते. तिच्या दोन्ही बाजूला प्रवृत्ती आणि निवृत्ती असे दोन काठ असतात. प्रवृत्ती म्हणजे कशालाही न जुमानता आपापल्या स्वभावाला जे आवडतंय, योग्य वाटतंय तसे वागणे. सर्व प्राणीमात्रांची वागणूक ही अशीच असल्याने ते मायानदीच्या अलीकडील प्रवृत्ती ह्या काठावर उभे असतात तर मी पलीकडल्या निवृत्ती ह्या काठावर उभा राहून त्यांची वाट पहात असतो. उफाणलेली माया नदी प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही उंच काठांमधून वहात असते. तिच्यावर त्रिगुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव होत असल्याने ती मोहरूपी महापुराने भरून यमनियमरूपी गावे वाहून नेत असते. तिच्यात मोठ्या संख्येने द्वेषरूपी भोवरे गरगरत असतात.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :

.