माया राजेश्वरनची जेसिकावर मात
वृत्तसंस्था / मुंबई
येथील सीसीआयच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या एल अॅण्ड टी पुरस्कृत डब्ल्युटीए टूरवरील मुंबई खुल्या 125 महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या माया राजेश्वरनने एकेरीच्या सामन्यात जेसिका फल्लाचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. तर या स्पर्धेत टॉप सिडेड मार्सिंकोने अनपेक्षितपणे निवृत्तीचा निर्णय घेतला.
महिला एकेरीच्या सामन्यात माया राजेश्वरनने जेसिका फल्लाचा 7-6, 1-6, 6-4 अशा सेटसमध्ये पराभव केला. या लढतीत मायाने पहिला सेट टायब्रेकरपर्यंत जिंकल्यानंतर जेसिकाने दुसरा सेट 6-1 असा एकतर्फी जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या मायाने मुसंडी मारत हा सेट 6-4 असा जिंकत पुढील फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात द्वितीय मानांकित मार्सिन्कोने अनपेक्षितरित्या निवृत्तीचा निर्णय घेतल्याने क्रोएशियाच्या अलेक्सांडर व्रुनिकला पुढे चाल मिळाली. जपानच्या यामागुचीने इब्रागी मोहाचा 4-6, 6-3, 7-6 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. टीना स्मिथने कुडाशोव्हाचा 6-3, 5-7, 6-4 असा पराभव केला.