माया ईश्वराच्या आधीन असते
अध्याय सहावा
मायेबद्दल सविस्तर सांगताना बाप्पा म्हणाले, चेतन माया ही जडमायेपेक्षा भिन्न स्वरूपाची असून ती शुद्ध स्वरुपाची असते. ती जडाचे पोषण करते. तिला सत्ता स्फूर्ती प्रदान करते. ती परा म्हणजे नजरेला दिसत नाही. ती जडमायेला सत्ता आणि स्फूर्ती प्रदान करते. ती अतिशय शुद्ध सत्वगुणप्रधान असल्याने चैतन्याचे प्रतिबिंब तयार करण्याचे सामर्थ्य तिच्यात असते. आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूत चैतन्य म्हणजे ईश्वरी अंश असतोच. तो ईश्वरी अंश हे ईश्वरी शक्तीचे प्रतिबिंब असतं. मनुष्य, पशुपक्षी, जीवजन्तु, जलचर आदि आपल्याला हालचाल करताना दिसतात याचं कारण ईश्वरी पराशक्ती त्यात असते म्हणूनच. वृक्षही सजीव असतात पण त्यातील परा शक्ती स्वप्नस्थितीत असल्याने अर्धनिद्रित अवस्थेत असते, तर दगड धातू इत्यादि एकाच ठिकाणी स्थिर असलेल्या वस्तूत ती सुप्तावस्थेत असते. परा माया जरी चेतनात्मक दिसत असली तरी ती चेतना ईश्वराचीच असते. म्हणजेच परा आणि अपरा हे मायेचे दोन्ही प्रकार ईश्वराच्या अधिपत्याखाली काम करतात. म्हणून या विश्वाचा निर्माता, चालक, नियामक, अधिपती ईश्वरच आहे ही संकल्पना बाप्पा पुढील श्लोकात समजाऊन सांगत आहेत.
आभ्यामुत्पाद्यते सर्वं चराचरमयं जगत् ।
संगाद्विश्वस्य संभूति, परित्राणं लयो, प्यहम्।
अर्थ - सर्व चराचरमय जग या दोन माया उत्पन्न करतात. यांच्या संगाने होणारी विश्वाची उत्पत्ति,पालन व लय हे माझ्यामुळे होते.
विवरण - आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे प्रकृतीचे म्हणजे मायेचे जड आणि चेतन असे दोन प्रकार आहेत. त्यांच्यामुळे जगताची निर्मिती होते. जड मायेमुळे वस्तूचा आकार तयार होतो तर चेतन मायेमुळे ती हालचाल करू लागते. माया ही ईश्वराची शक्ती असून ती ईश्वराच्या इच्छेनुसार काम करते म्हणून हे सर्व जग ईश्वराच्या आधीन असून त्याच्या मर्जीनुसार चालतं असं म्हणतात. असं जरी असलं तरी माणसाला ते सहजासहजी पटत नाही कारण तो स्वत:ला कर्ता समजत असतो. खरं म्हणजे त्याला ईश्वरी शक्ती त्याच्या पाठीमागे उभी असल्याचा अनुभव खूप वेळा येत असतो तरीही स्वत:च्या कर्तृत्वावर त्याचा फार विश्वास असतो त्यामुळे तो ईश्वराचे प्रभुत्व मानण्यास सहजी तयार होत नाही. ईश्वर अदृश्य असल्याने तो कुणाला सहजी दिसत नाही. ज्याप्रमाणे मण्याच्या माळेकडं बघितलं की, फक्त मणी दिसतात पण त्यांना एकत्र ओवणारा दोरा दिसत नाही पण तो त्यांना अदृश्यपणे एकत्र ठेवत असतो त्याप्रमाणे स्वत: कुणाच्या नजरेला न दिसता अदृश्यपणे ईश्वर दिसणारे जग सांभाळत आहे. आपल्याला झाड दिसत असतं पण त्याची जमिनीतली मुळं दिसत नाहीत पण जमिनीवर दिसणारे झाडाचे अवयव म्हणजे बुंधा, फांद्या, पानं, फुलं, फळं या सर्व गोष्टी मुळामध्येच लपलेल्या असतात. म्हणून झाडाच्या वर सांगितलेल्या दिसणाऱ्या गोष्टी ही मुळांची लीला असते. त्याप्रमाणे एकादश प्रकृतीच्या म्हणजे जड मायेच्या माध्यमातून ईश्वरी लिलेच्या स्वरूपात जग दिसत असते आणि परा मायेच्या स्वरूपातून त्यात चैतन्य निर्माण होते.
क्रमश: