For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

माया, वैष्णवी यांचा पहिला डब्ल्यूटीए टूर विजय

06:34 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
माया  वैष्णवी यांचा पहिला डब्ल्यूटीए टूर विजय
Advertisement

बलाढ्या प्रतिस्पर्ध्यांना दिला पराभवाचा धक्का

Advertisement

वृत्तसंस्था, चेन्नई

भारताच्या उदयोन्मुख टेनिसपटू माया राजेश्वरन रेवती आणि वैष्णवी अडकर यांनी चेन्नई ओपनमध्ये नेत्रदीपक विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या विजयांसह त्यांनी आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदच डब्ल्यूटीए टूर स्तरावरील सामने जिंकले आहेत. मायाने जागतिक क्रमवारीत 115 व्या स्थानी असलेल्या आणि स्पर्धेत आठवी मानांकित खेळाडू कतारझिना कावा हिच्याविरुद्ध तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. हा तिच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. दुसरीकडे वैष्णवी अडकरने ब्रिटनच्या जोडी बरिजविरुद्धच्या अत्यंत कठीण आणि दमट हवामानातील सामन्यात जिद्द दाखविली. निर्णायक सेटमध्ये 3-5 अशा पिछाडीवरून पुनरागमन करत तिने 3-6, 6-3, 7-5 असा विजय नोंदवला. माया देखील निर्णायक सेटमध्ये 2-5 अशी पिछाडीवर होती, परंतु तिने हार न मानता जिद्दीने खेळ करत पोलंडच्या कावाचा 6-4, 2-6, 7-6 (5) असा पराभव केला. हा सामना दोन तास 27 मिनिटे चालला.

Advertisement

याआधी, आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने प्रगती करत असलेल्या 21 वर्षीय वैष्णवीला अनुभवी जोडी बरिजविरुद्ध संघर्ष करावा लागला. बरिज ही एकेकाळी जागतिक क्रमवारीत पहिल्या 100 खेळाडूंमध्ये होती आणि तिने अनेकदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. सुरुवातीला काहीशी दडपणाखाली असलेल्या वैष्णवीने पहिला सेट गमावला. परंतु दुसऱ्या सेटमध्ये तिने आपल्या खेळात लक्षणीय सुधारणा केली. तिने सर्व्हिस रिटर्नवर भर दिला आणि बेसलाईनवरुन अधिक सातत्यपूर्ण खेळ करत सामन्यात बरोबरी साधली. प्रेक्षक गॅलरीतून भारताचे माजी डबल्स स्टार रोहन बोपण्णा, जे वैष्णवी ज्या अकादमीत सराव करते तिथे प्रशिक्षक आहेत, तिला सतत प्रोत्साहन देत होते. बरिज थकलेली दिसत असताना बोपण्णा तिला सूचना देत होते.

इतर सामन्यांमध्ये इंडोनेशियाची अव्वल मानांकित जॅनिस त्जेन हिने अमेरिकेच्या कॅथरीन हुईचा 6-1, 6-2 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. हा सामना एक तासापेक्षा कमी वेळात संपला. दुसरीकडे चौथी मानांकित हंगेरीची पन्ना उडवा•ाaला अमेरिकेच्या रॉबिन मॉन्टगोमेरीकडून (जी यावर्षीच्या यूएस ओपनमध्ये दुहेरी गटाची उपविजेती ठरली होती) 6-4, 1-6, 6-1 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला आणि स्पर्धेतून बाहेर पडली. तैपेईच्या जोआना गारलँडने स्वित्झर्लंडच्या जिल टीचमनचा 6-3, 6-4 असा पराभव केला. तर पोलंडच्या वेरोनिका फाल्कोव्स्काने झेक प्रजासत्ताकच्या लिंडा फ्रुहविर्टोव्हावर 7-6 (3), 6-4 असा विजय मिळवला. रशियाच्या ओक्साना सेलेख्मेतेव्हा हिनेही सर्बियाच्या तियोडोरा कोस्तोविचचा 6-4, 6-3 असा पराभव करून स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.

Advertisement
Tags :

.