ह्यांचा चि व्हावा जय आमुचा की । कशात कल्याण असे न जाणो
अध्याय दुसरा
भगवंत अर्जुनाला म्हणाले, तुझ्या मनात नातलगांबद्दल हा मोह कोठून उत्पन्न झाला हे काही कळत नाही परंतु अर्जुना हे वाईट आहे. हे सर्व ऐकून अर्जुन भगवंतांना म्हणाला, हे मधुसूदना, पितामह भीष्म आणि गुरू द्रोणाचार्य यांच्यावर कसे बाण सोडू? ते दोघेही आम्हाला पूजनीय आहेत. पितामह भीष्म व गुरू द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे! महान परमपूज्य गुरूंना मारण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे हे मला कल्याणकारी वाटते. गुरूजनांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेल्या अर्थरूप व कामरूप भोगांना मी कसे भोगू? ह्या अर्थाचा न मारिता थोर गुरुंस येथे । भिक्षा हि मागूनि भले जगावे? हितेच्छु हे ह्यांस वधून भोग । भोगू कसे भंगुर रक्त-मिश्र ।। 5 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुनाने श्रीकृष्णांना गुरु द्रोणाचार्यांबद्दल असे सांगितले की, त्यांच्या मनाला खवळणे कसे ते ठाऊकच नाही. एकवेळ अमृतही विटेल, किंवा कालवशात वज्रही भंगेल पण यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी यांचे मन आपला धर्म सोडणार नाही. ममता आईनेच करावी असे म्हणतात परंतु द्रोणाचार्य हे ममतेची मूर्ती आहेत. हे दयेचे माहेरघर, सर्व गुणांचे भांडार आणि विद्येचे अनंत सागर आहेत. आमच्यावर यांची विशेष कृपा आहे. अशा स्थितीत यांच्या घाताची कल्पना आमच्या मनातसुद्धा येणार नाही. यांना समरांगणी मारावे आणि मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा ही गोष्ट अंत:करणापासून मनाला पटत नाही. म्हणून राज्यभोग मिळवण्यासाठी त्यांना मारण्यापेक्षा भीक मागून जगणे मला योग्य वाटते. एकवेळ देश त्यागावा, डोंगर दऱ्यात जाऊन रहावे पण यांचा घात करण्यासाठी शस्त्र हाती धरू नये. देवा! नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानी प्रहार करून, यांच्या रक्तात बुडालेले भोग आम्ही भोगावेत, हे योग्य नाही. ते प्राप्त करून तरी काय उपयोग आहे? रक्ताने भरलेल्या त्या भोगांचा उपभोग तरी कसा घ्यायचा? म्हणून तुम्ही युद्ध कर असे सांगताय ते मला पटत नाही.
अशा पध्दतीने अर्जुन त्याचे म्हणणे भगवंतांना पटवून द्यायचा प्रयत्न करत होता परंतु तो करत असलेल्या युक्तीवादातला एकही मुद्दा त्यांच्या मनाला पटला नाही. अर्जुनाच्या बोलण्यावरील त्यांची नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. कृष्ण आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, युद्ध न करण्याविषयी आपण सांगत असलेली कारणे त्याला पटत नाहीत म्हणजे आपण नक्की कुठतरी चुकतोय हे समजून अर्जुन घाबरला.
पुढील श्लोकात तो म्हणाला, देवा नक्की जय कुणाचा व्हावा, आमचे कल्याण कशात आहे हेच मला कळेनासे झाले आहे. एक मात्र नक्की ज्यांना मारून जगावे असे मला वाटत नाही तेच नेमके युद्धाला समोर उभे आहेत.
ह्यांचा चि व्हावा जय आमुचा की । कशात कल्याण असे न जाणे? मारूनि ज्याते जगणे न इच्छू । झुंजावया ते चि उभे समोर? ।।6।।
श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, देवा ह्यांचा जय व्हावा की, आमचा हे काहीच कळेनासे झाले आहे. कशात कुणाचे कल्याण आहे ते एक तुम्हालाच माहित पण ज्यांना मारून मला जगावंसं वाटत नाही तेच नेमके युद्धाला पुढे उभे ठाकले आहेत. ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याचा विचार मनात आल्याबरोबर आम्ही प्राण सोडायला हवेत त्यांच्याशीच युद्ध करायची वेळ आली आहे. आता अशांचा वध करावा किंवा यांना येथे सोडून निघून जावे या दोहोंपैकी काय करावे तेच समजत नाही. एखाद्या समस्येवर तोडगा काढताना बऱ्याचवेळा माणसाला नक्की काय करावे हे समजले नाही की, तो गोंधळतो. अर्जुनाची अशीच अवस्था झाली होती.
क्रमश: