देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो
अध्याय नववा
निर्गुण उपासना करणे क्लेशदायक असल्याने ती करण्यापेक्षा सगुण उपासना करणे तुलनेने सोपे आहे. विशेष म्हणजे निर्गुण उपासना करणाऱ्यांना जे फल मिळते तेच फल सगुण उपासना करणाऱ्या भक्तांना मिळते ह्या आशयाचा अव्यक्तोपासनाद्दुऽ खमधिकं तेन लभ्यते । व्यक्तस्योपासनात्साध्यं तदेवाव्यक्तभक्तितऽ ।।6।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत.
समोर ईश्वराची मूर्ती दिसत नसताना मनाची एकाग्रता होणं कठीण असल्याने आपल्याला अव्यक्त उपासना जमणे शक्य नाही असा क्लेशदायक विचार मनात येऊन भक्त दु:खी होतो. त्याने निराश होऊन भक्ती करणे सोडून देऊ नये म्हणून बाप्पा सांगतायत, अव्यक्त उपासनेच्या योगाने जे साध्य होते तेच व्यक्त भक्तीच्या योगाने साध्य होते.
उपासना सगुण वा निर्गुण कोणतीही असो, देहबुद्धी विसरणे म्हणजे भक्ताने त्याचे अस्तित्व देहाच्या रूपात आहे हे विसरणे. देह असला किंवा नसला तरी काहीही फरक पडत नाही अशी खात्री मात्र व्हायला हवी. नामदेव महाराजांनी अशी अनुभूती घेऊन अभंग रचला तो असा, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो । चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा ।वदनी तुझे मंगलनाम हृदयी अखंडित प्रेम । नामा म्हणे केशवराजा केला पण हा चालवी माझा ।
माणसाला त्याच्या देहाचे अतोनात प्रेम असते आणि सदोदित काय केले म्हणजे आपल्या देहाला सुखाचे होईल ह्या विचाराने त्याचे विचार आणि हालचाली सुरु असतात. आपली खरी ओळख आत्मा ही असल्याने सध्याचा मनुष्य देह ही आपली तात्पुरती ओळख असते आणि तात्पुरती गोष्ट ही नाशवंत असते. त्याउलट आत्मा हा अमर असतो. श्रीकृष्णांनी गीतेच्या सुरवातीलाच हे तत्व अर्जुनाला समजावून सांगितले आहे. हे लक्षात घेऊन देहाबाबत आपण अभिमानी असणे उपयोगी नाही. ही भावना पक्की होण्यासाठी सद्गुरूंच्या शिकवणुकीचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. ह्यालाच सद्गुरु सेवा असं म्हणतात. गोंदवलेकर महाराज सांगतात, सद्गुरु सेवा पूर्ण होणे आणि देहबुद्धी नष्ट होणे या दोन्ही गोष्टी एकदमच घडतात. देहबुद्धी नष्ट झाली की, आयुष्यात जे घडेल तीच ईश्वरी इच्छा म्हणून स्वीकारायची मनाची तयारी होते. देवाची व भक्ताची इच्छा एकच होणे म्हणजे भक्ताला स्वत:ची अशी कोणतीच इच्छा न होणे. मग आपोआपच देवाची इच्छेप्रमाणे जे घडेल ते स्वीकारायची त्याची तयारी होते. ह्यालाच देह प्रारब्धावर टाकणे असे म्हणतात. हीच मोक्षावस्था होय. ज्याने देह प्रारब्धावर टाकला असेल त्याला प्रारब्धानुसार देह सुखात असला किंवा दु:ख भोगत असला तरी त्याबद्दल काहीच वाटत नाही. तो आहे त्या परिस्थितीत सुखाने देवभक्ती करत असतो.
ह्यातील गंमत अशी की परिस्थितीत सतत बदल होत असल्याने जी येईल ती परिस्थिती त्याला मान्य असते आणि त्यात तो समाधानी असतो. सर्व संतांनी ही अवस्था अनुभवलेली आहे हे त्यांची चरित्रे अभ्यासली की, लक्षात येते. त्यांनी देह प्रारब्धावर टाकलेला असल्याने ते सोसत असलेल्या कष्ट, त्यांचे दु:ख हलके व्हावे म्हणून देव त्यांना मदतही करत असतो. जनाबाईची लुगडी धुतो, चोखामेळ्यासंगे ढोरे ओढतो, नरहरी सोनाराची नळी फुंकू लागतो अशी कित्येक उदाहरणे आपल्याला माहित आहेत. अशा निरिच्छ अवस्थेत, वदनी ईश्वराचे नाम आणि त्याच्याबद्दल अखंड प्रेम या दोनच गोष्टी करायचा वसा किंवा पण नामदेव महाराजांनी केलेला आहे. याचाच असाही अर्थ निघतो की, जो मनुष्य देहबुद्धी विसरण्यासाठी सद्गुरू सेवा सातत्याने करत असेल त्याची देहबुद्धी नष्ट होऊन तो निरिच्छ अवस्थेकडे जाण्यासाठी पात्र होत राहील. म्हणून बाप्पा म्हणतात, अशी सगुणोपासना जो करेल त्याचाही मी उध्दार करतो.
क्रमश: