मविआचा नवा फॉर्म्युला
काँग्रेस 105, ठाकरे गट 85 व शरद पवार गट 70 जागा यावर एकमत होण्याची शक्यता
मुंबई :
गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील जागावाटपाच्या मुद्यांवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु असल्याने महाविकास आघाडीत काहीसा तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मविआतील ज्येष्ठ नेत्यांनी आता नव्याने चर्चेची सुत्रे हाती घेतली आहेत. यामध्ये नव्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस 105, ठाकरेगट 85 व शरद पवार गट 70 जागा यावर एकमत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरुन मविआची गाडी पुन्हा रुळावर येत असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे मविआत मागील काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आता काँग्रेसने अनुभवी नेतृत्व असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेची नव्याने सुत्रं सोपवली आहेत. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी सकाळी मुंबईत येत प्रथम शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते.
बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. या फॉर्म्युलानुसार, काँग्रेस पक्ष 110 जागांवर लढणार होता. यापैकी 5 जागा चर्चेअंती कमी जास्त होण्याची शक्यता असून ती 105 वर राहण्याची शक्यता आहे. तर ठाकरे पक्ष 90 जागांवर लढणार होता मात्र यामध्येही काही बदल होण्याची शक्यता असून तो 85 जागांवर थांबण्याचे संकेत आहेत. कारण यात पाच जागा कमी होऊ शकतात. तर शरद पवार गट 75 जागांवर लढणार होता. मात्र, आता तडजोड करण्यासाठी पाच जागा कमी घेत 70 वर एकमत होण्याची शक्यता असून यावर अजून एकमत झाले नसून ते होण्याची चर्चा असल्याची माहिती आहे.
कारण हे जागावाटप करताना मविआच्या मित्रपक्षांचाही विचार करण्यात आला आहे. या जागांचे वाटप झाल्यानंतर समाजवादी पक्षाला सामावून घेण्यासंदर्भात निर्णय होईल, असे सांगितले जाते. आज दुपारी मविआच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक पार पडेल. यानंतर ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महायुतीचे जागावाटप 25 जागांमुळे अडले
महायुतीचे जागावाटप 25 जागांमुळे रखडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावणकुळे आणि प्रफुल पटेल यांच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. भाजपने पहिली जागा जाहीर केल्यानंतर सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 60 नावांची यादी बैठकीत मांडल्याची सूत्रांची माहिती आहे. यावेळी विद्यमान आमदारांना तिकिट देण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. उर्वरित 25 जागांचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आल्याचे कळते. त्यावर स्थानिक पक्षीय बलाबल, जातीय राजकारण या जागांवर तीन पक्षातील प्रमुख नेते बसून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
कल्याण, ठाणे आणि धुळे या तीनजागांबाबत शिंदे गट आणि भाजपमध्ये मतभेद आहेत. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्राया गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गट तेथे बंड करण्याची शक्यता आहे. ठाण्यात भाजपने संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तेथे शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे इच्छुक आहेत. तर धुळ्यात भाजपने अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तेथेङी शिंदे गटाचा दावा आहे. अशा एकूण 25 जागा आहेत.
एकनाथ शिंदे अर्ज भरण्यापूर्वी कामाख्यादेवीचा आशीर्वाद घेणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर होताच घडामोडींना वेग आला आहे. कुठे रुसवेफुगवे वाढत आहेत, तर कुठे तणावाची स्थिती सामंजस्याने निवळली जात आहे. तर कुठे देवीला साकडे घातले जात आहे.
दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसह सुरतमार्गे गुवाहाटी येथे पोहोचले होते. तेथे कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात येत म़ुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता दोन वर्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशिरा गुवाहाटी येथे कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत.