म्हाऊसमध्ये 40 लाखांच्या विकासकामांचे आमदार डॉ. देविया राणे यांच्या हस्ते उद्घाटन; ग्रंथालयासह कचरा व्यवस्थापन केंद्राचे लोकार्पण
नूतनीकरण केलेल्या ग्रंथालयातून डिजिटल शिक्षणाला चालना
म्हाऊस ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयाचे नूतनीकरण राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षात करण्यात आले. बालक आणि किशोरवयीन मुलांसाठी ग्रंथालय सुविधा आणि डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
ग्रंथालयात बांधकामविषयक सुधारणा, नवीन फर्निचर, विद्युत सुविधांमध्ये सुधारणा तसेच संगणक आणि दूरचित्रवाणीची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना वाचन, अभ्यास आणि डिजिटल माध्यमांतून ज्ञान मिळविण्यासाठी अधिक चांगले वातावरण उपलब्ध होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील मुलांमध्ये डिजिटल साक्षरता वाढविण्यासह वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे.
25 लाखांचे एमआरएफ केंद्र सुरू
गावातील कचरा व्यवस्थापन अधिक शास्त्रीय आणि नियोजनबद्ध करण्यासाठी म्हाऊस ग्रामपंचायतीच्या मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले. स्वच्छ भारत मिशन 2.0 (ग्रामीण) अंतर्गत 25 लाख रुपये खर्चून हे केंद्र उभारण्यात आले आहे.
या केंद्राच्या माध्यमातून कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापरयोग्य कचऱ्याचे संकलन आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या व्यवस्थेला बळ मिळणार आहे. त्यामुळे कचऱ्याची अनियंत्रित विल्हेवाट रोखण्यास, स्वच्छता सुधारण्यास आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत होईल. या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे.
शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य
म्हाऊसतील या दोन्ही प्रकल्पांमुळे गावातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार असून, विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध होण्याबरोबरच कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल सक्षमीकरण, शिक्षणाचा विस्तार आणि स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याच्या संकल्पनेशी हे उपक्रम सुसंगत आहेत. गावपातळीवर विकासकामे राबवून स्थानिक नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार डॉ. देविया राणे यांनी सांगितले.