माउलींची पालखी वाल्हे मुक्कामी
पुणे :
हरिनामाच्या गजरात व निसर्गाशी एकरूप होत संत ज्ञानेश्वर माउलींचा सोहळा वाल्हे मुक्कामी, तर संत तुकोबारायांचा पालखी सोहळा उंडवडी गवळ्याची येथे बुधवारी विसावला. माउलींच्या पालखीचा गुऊवारी नीरा स्नान सोहळा असून, त्यानंतर पालखी लोणंदमध्ये मुक्काम करणार आहे. तर तुकोबांची पालखी बारामतीच्या दिशेने निघेल.
खंडेरायाचे दर्शन घेऊन व जेजुरीकरांना निरोप देऊन माउलींचा पालखी सोहळा सकाळी पंढरीच्या वाटेला लागला. अभंगाच्या तालावर डोलत, नाचत व निसर्गाशी एकरूप होत वारकरी पुढे पावले टाकू लागले. वाल्हेमार्गावरचा र्दौडचा खिंडीचा टप्पा वैशिष्ट्यापूर्ण मानला जातो. येथील आल्हाददायक वातावरणाने वारकऱ्यांची मने मोहरली. अभंगाच्या तालावर नृत्य, फुगड्या रंगल्या. येथील विसावा हा मनाला प्रसन्नता आणि शीतलता देतो. वारकरी व भाविकांनी दौंडज खिंडीत हीच अनुभूती घेतली. येथील निसर्गरम्य वातावरण, घाटातील चढ उतार हरिनामाच्या बळावर पार करत सोहळा वाल्हे मुक्कामी पोहोचला. महर्षी वाल्मिकींच्या वाल्ह्यात माउलींच्या पालखीचे थाटात स्वागत करण्यात आले. संपूर्ण गाव ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात रंगून गेला.
पालखीचा आज सातारा जिल्ह्यात प्रवेश होणार आहे. जेजुरी ते वाल्हे हा 12 किमीचा टप्पा आहे. हा टप्पा ओलांडल्यानंतर पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करते. गुऊवारी माउलींच्या पालखीचा नीरा स्नान सोहळा आहे. त्यामुळे वारकऱ्यांचे डोळे आता नीरा स्नानाकडे लागले आहेत. विठुनामाच्या गजरात माउलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येईल. त्यानंतर पालखी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणंदमध्ये विसावेल.
- तुकोबांची पालखी गुरुवारी बारामतीत
संत तुकाराम महाराजांची पालखी बुधवारी सकाळी वरवंडहून निघाली. टाळ मृदंगाच्या गजरात वैष्णवांचा मेळा पुढे सरकू लागला. दिंड्यादिंड्यात अभंगाचे सूर उमटत होते. खांद्यावर भगवा पताका ल्यालेले वारकरी, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वांनाच आनंद देऊन जात होता. पालखी रथातील पादुकांच्या दर्शनाने भाविक सुखावून जात होते. अशा भारावलेल्या वातावरणातच सोहळा उंडवडी गवळ्याची मुक्कामी पोहोचला. गुऊवारी पालखी बारामती मुक्कामी पोहोचेल.