For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : चिकोत्रा नदीकाठी रंगला माऊली अश्वांचा रिंगण सोहळा..!

12:50 PM Dec 29, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur news   चिकोत्रा नदीकाठी रंगला माऊली अश्वांचा रिंगण सोहळा
Advertisement

                                      चिकोत्रा नदीकाठी वैष्णवांचा मेळा अवतरला

Advertisement

सेनापती कापशी : परशुराम तावरे क्रीडा संकुल व ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने चिकोत्रा खोऱ्यातील वारकरी संप्रदायाच्या आग्रहस्तव चिकोत्रा नदीकाठी सेनापती कापशी येथे प्रथमच माऊली अश्वांचा भव्य रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या रिंगण सोहळ्याला परिसरातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. जणू वैष्णवांचा मेळाच रविवारी सायंकाळी चिकोत्रा नदीकाठी जणू अवतरला होता. आयोजकांच्या वतीने नेटके नियोजन केले होते.

सेनापती कापशी येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, उद्योजक परशुराम तावरे व त्यांच्या पत्नी सौ. अश्विनी तावरे यांच्या संकल्पनेतून माऊली अश्वांचा रिंगण सोहळा आयोजित केला होता. या रिंगण सोहळ्यासाठी चिकोत्रा खोऱ्यातील गावा-गावातून वारकरी संप्रदायातील भाविक दुपारीच टाळ, मृदंगाच्या निनादात, विठू माऊलींच्या नाम गजरात दिंडीने सहभागी झाले होते. परशुराम तावरे क्रीडा संकुलाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. माऊली अश्वांचा प्रथमच येथे रिंगण सोहळा असल्याने सर्वांच्या कुतूहलाचा विषय होता.

Advertisement

दुपारी सर्वप्रथम एक वाजता परशुराम तावरे यांच्या निवासस्थानी या अश्वांचे आगमन झाले. भक्ती भावाने अश्वांचे पाद्यपूजन झाले. यानंतर तुरंबे येथील ज्ञानोबा तुकोबा वारकरी सांप्रदाय शिक्षण संस्थेचे प्रमुख ह.भ.प. ओमकार महाराज सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सेनापती कापशीतील प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात आली. यामध्ये परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये गेल्या १९० वर्षाहून अधिक काळ अश्व रिंगण सोहळ्याची वैभवशाली परंपरा जोपासणाऱ्या अंकली येथील राजे अर्जितसिंग शितोळे यांच्या मानाच्या अश्वांचा रिंगण सोहळा येथे पार पडला. उपस्थितांनी अश्वांचे पाद्य ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणची धूळ आपल्या मस्तकी लावण्यासाठी एकच गर्दी केली होती. आलेल्या भाविकांना सोहळा पाहता आला. डोळ्यांचे पारणे फिटले. ज्यांना माऊलींच्या वारीमध्ये सहभागी होता येत नाही, अशा भक्तांसाठी हा गोल रिंगण सोहळा तर खूप खूप महत्त्वाचा ठरला. हा सोहळा 'याची देही याची डोळा' भक्तांनी अनुभवला..!

Advertisement
Tags :

.