माऊलींचा सोहळा आज हैबतबाबांच्या भूमीत! प्रशासनाची जय्यत तयारी, माऊलींच्या पादुकांना आज पहिलं स्नान
लोणंद वार्ताहर
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने चालला असून आज शनिवारी हा पालखी सोहळा जिह्यात लोणंद या ठिकाणी अडीच दिवसाच्या मुक्कामासाठी विसावणार आहे. सोहळ्यातील पहिलं स्नान माऊलींच्या पादुकांना नीरा नदीवर घातलं जाणार आहे. हा सोहळा जिल्ह्यात पाच दिवस मुक्कामी असून दि. 11 रोजी माऊलींना सातारा जिल्ह्याचा निरोप दिला जाणार आहे. लोणंद येथे येत असलेल्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दि. सहा ते आठ दरम्यान नगरपंचायत लोणंद, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, महावितरण विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन या विभागांमार्फत पालखी सोहळा सुरक्षित पार पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
लोणंद नगरपंचायतीच्या वतीने पालखी तळावर मुरमीकरण व कच टाकून संपूर्ण तळ सुस्थितीत करण्यात आला असून खेमावती नदी संपूर्ण स्वच्छ करण्यात आली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी व खंडाळा तहसिलदार यांच्या सूचना व आदेशानुसार नगरपंचायतीच्या वतीने जेसीबी, फरांडी ट्रॅक्टर, रोड रोलर यांच्या सहाय्याने रहदारीच्या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे व झाडे काढून मुरुम टाकून सपाटीकरण करणेत आले आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकरीता बाजारतळ येथील धोबीघाटाची संपूर्ण दुरुस्ती व स्वच्छता करण्यात आली आहे; तसेच महिलांसाठी नवीन स्नानगृह बांधण्यात आले आहे. संपूर्ण तळावर फ्लड लाईट, डेकोरेशन त्याच प्रमाणे विश्वस्तांच्या सल्ल्यानुसार दर्शन रांगा व उन्हाची तिव्रता लक्षात घेवून दर्शन रांगेवरती सावली करण्यात येत असून दर्शन रांगेत पाय भाजू नयेत म्हणून मॅट टाकण्यात येत आहे. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठीच्या सार्वजनिक शौचालयांसाठी 14 ठिकाणी नियोजन करून त्या ठिकाणी स्वच्छता व विद्युत कनेक्शनची सोय करण्यात आली आहे. तसेच पालखी सोहळ्यानिमित्ताने येणाऱ्या सर्व दिंड्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने साफसफाई, स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फॉगिंग मशिनव्दारे धूर फवारणी करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी पोहोच रस्त्यावर देखील मुरुम टाकण्यात आला आहे अशी माहिती लोणंद नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीमा वैभव खरात व उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर तसेच मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
पालखी सोहळ्यासाठी पाणीपुरवठा अंतर्गत सर्व पाणीपुरवठा टाक्यांचे निर्जतुकीकरण करण्यात आले आहे. गांवठाण आर.सी.सी. उंच टाक्या-4, जांभळीचा मळा, बेलाचा मळा, जलशुध्दीकरण केंद्र, पाडेगांव सर्व टँक मशीनद्वारे सफाई करुन निर्जतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच सर्व योजना यामध्ये पाडेगांव पंपींग मशीनरी, इले. मोटर्स, इंदिरानगर, वेअर हाऊस, दगड वस्ती, बेलाचा मळा येथील सर्व इलेक्ट्रिक मोटर्सची तसेच सर्व पाणीपुरवठा योजनांचे व्हॉल्व दुरुस्त करण्यात आले असून चेंबर बांधकाम करण्यात आले आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक ती सर्व सामुग्री, खरेदी करण्यात आली आहे. तसेच पाणी शुध्दीकरणासाठी आवश्यक टि.सी.एल. व तुरटी खरेदी करण्यात आली आहे. पालखी मुक्काम अडीच दिवस असल्याने शौचालयाच्या ठिकाणी पुरेशा पाण्याची व्यवस्था तसेच पाणी टँकर वेळेत, आवश्यक ठिकाणी पोहोचतील याचे नियोजन करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने गावठाण अंतर्गत असलेली सर्व सार्वजनिक शौचालये दुरुस्ती केली आहेत. त्याचप्रमाणे गांवठाणमधील सर्व गटारांची सफाई नियमितपणे केली जात असून गटारालगतचे गवत काढण्यात आले आहे. पालखी काळात गटारावर डी.डी. टी. पावडर टाकण्यासाठी पावडर साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. मुतारी सफाई करण्यासाठी फिनेल, डांबर गोळ्या खरेदी करण्यात आले आहेत.
नगरपंचायतीच्या वतीने पालखी तळावर सुलभ शौचालय उभारण्यात आले आहे. लोणंद गांवठाण व वाड्या-वस्त्यांवरील रोडलाईट्सची दुरुस्ती करण्यात आली असून गांवठाणमध्ये सर्व महत्वाचे चौकात कायमस्वरुपी फ्लड लाईट्स (हायमास्ट) व्यवस्था करण्यात आलेली असून गांवठाणसह वाडीवस्त्यावरील दिवे दुरुस्त केलेले आहेत.
सार्वजनिक स्वच्छतेअंतर्गत गांवठाणमधील सर्व रस्त्याकडेची काटेरी झाडे काढण्यात आली आहेत. खुल्या जागेतील स्वच्छता ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यात आली असून रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून भरण्यात आले आहेत. याशिवाय माऊलीचे पालखी तळावर मदत केंद्र, आरोग्य विभाग, दवाखाना, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन सेवा या सर्व अत्त्यावश्यक बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. वारकरी स्नानासाठी पालखी तळावर स्नानगृह सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे. लोणंद पालखी तळावर पालखी आगमनापुर्वी निरा येथे पालखी सोहळा आल्यापासून पालखी सोहळा तरडगाव येथून पुढे जाईपर्यंत दि. 06, 07 व 08 जुलै 2024 अखेर दिंड्यांचे टँकर भरण्यासाठी नगरपंचायत विविध ठिकाणी तात्पुरती वॉटर फीडींग पाँईटस् करण्यात आले आहेत. तसेच पालखीतळ व शास्त्राrचौक येथे एल.इ.डी. क्रीन प्रत्यक्ष दर्शनासाठी लावण्यात आल्या आहेत. नगरपंचायत लोणंद मार्फत माऊलींच्या स्वागताचे नियोजन नगरपंचायत समोर सालाबादप्रमाणे करणेत येणार आहे. अशी माहीती देण्यात आली आहे.
यावेळेस लोणंद नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीमा वैभव खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, नगरसेवक शिवाजीराव शेळके-पाटील, गणीभाई कच्छी, भरत शेळके-पाटील, भरत बोडरे, सागर शेळके, नगरसेविका तृप्ती राहुल घाडगे, ज्योती डोणीकर, रशीदा इनामदार, सुप्रिया शेळके, मधुमती पलंगे तसेच असगर इनामदार, बंटी खरात, गणेश शेळके, मुख्याधीकारी दत्तात्रय गायकवाड, सागर मोटे, कार्यालयीन अधीक्षक शंकर शेळके, विजय बनकर, बाळकृष्ण भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालखीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024 चे अनुंषगाने पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार संपुर्ण सातारा जिल्ह्यातील 1 अप्पर पोलीस अधिक्षक, 4 डि. वाय. एस.पी, 16 पोलीस निरीक्षक, 78 सपोनि/पोऊनि, 729 पुरुष पोलीस जवान, 68 महिला पोलीस अंमलदार, 103 वाहतुक पो. अंमलदार, असे एकुण 98 पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार 900 व 351 पुरुष होमगार्ड व 71 महिला होमगार्ड असे एकुण 422 होमगार्ड व 01 एस.आर.पी कंपनी पालखी सोहळयामध्ये बंदोबस्तास नेमणेत आले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे अन् वेगवेगळी पथके
तसेच पालखी आगमन व मुक्कामाचे ठिकाणी व पालखी सोहळयामध्ये गर्दीचे ठिकाणी गुन्हेगार व समाजकटंकावर नजर ठेवण्याकरीता व महिलांची छेडछाड, चोरी करणारे यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाजगी व सरकारी सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच खाजगी वेशात 05 अधिकारी व 50 पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले असून सदरची पथकेही चोन्या, चेनस्नॅचींग रोखण्यासाठी तसेच त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली आहेत. व पालखी तळावर वॉँच टॉवर लावण्यात आली असुन दिवसपाळी व रात्रपाळी करीता एस.आर.पी.एफ पथके नेमण्यात आलेली आहेत
भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग सुविधा
पर्यायी वाहतुकीसाठी जुना टोलनाका ते ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, मिरेवाडी, कुसुर, माळेवाडी, शिंदेमाळा, तरडगाव तसेच रजतसागर हॉटेल, पाडेगाव पाटी ते नेवसेवस्ती ते तरडगाव मार्गे असे वळविण्यात आली आहे. भाविकाच्या जिवित व मालांचे रक्षणासाठी रात्री व दिवसा भागातुन मोबाईल पेट्रोलींग करीता वाहने नेमण्यात आलेली आहेत. तसेच गुन्हेगार व समाजकटंकावर नजर ठेवण्याकरीता मोटर सायकलवरुन पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे. लोणंद शहरात एस.टी.स्टँन्ड, रेल्वे स्टेशन, निरा चौक, शिरवळ चौक, गांधी चौक, पालखीतळ येथे ठिकठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पालखी तळावर ड्रोन कॅमेरेद्वारे सर्व हालचालीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. लोणंद शहरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कृषीराज लॉन्स खंडाळा रोड गोटेमाळ सातारा रोड एमआयडीसी शिरवळरोड कापडगाव फाटा फलटण रोड शेळके पेट्रोलपंप निरा रोड या ठिकाणी पार्कींगची सोय करण्यात आलेली आहे. तसेच पार्कीगसाठी पोलीस अंमलदार नेमण्यात आलेले असून दिशादर्शक बोर्ड लावण्यात आलेले आहेत. निरा-सातारा, लोणंद-फलटण हे रोड सदर वेळी वाहतुकीसाठी पूर्ण बंद राहणार आहेत. त्यासाठी पायी मार्गाचा अवलंब करावा तसेच लोणंद शहरातील नागरीकांनी पालखी काळात आपली वाहने शक्यतो रोडवर आणु नयेत पायी चालत जाणे याबाबत आवाहन करणेत येत आहे.