आजपासून माथेरान बंदची हाक !
पर्यटन बचाब संघर्ष समितीने उचलला आवाज
माथेरान
माथेरान पर्यटकांच्या होणाऱ्या फसवणुकीविरोधात पर्यटन बचाव संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी या समितीने आजपासून माथेरान बंदची हाक दिली आहे. माथेरान बंदला येथील हॉटेल इंडस्ट्रीसह, ई रिक्षा संघटनेनी जाहीर पाठींबा दिला आहे.
माथेरानचे प्रवेश शुल्क दस्तुरी नाका येथे घेतले जाते. याच ठिकाणी पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली जाते. या फसवणुकीच्या प्रकाराचा सर्व कष्टकरी ते हॉटेल इंडस्ट्रीज या सर्वांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे.
माथेरानचे मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजेच दस्तुरी नाक्यावर पर्यटकांची फसवणुक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. याठिकाणाहून पर्यटकांना बळजबरी गावात येण्याऐवजी पॉईंट्स दाखवून उशीर हॉटेल्समध्ये सोडण्यात येते. मिनी ट्रेन बंद असून ई रिक्षा ही फक्त स्थानिकांना दिली आहे अशी खोटी माहिती पुरवून स्वतःच्या घोड्यावर बसवून नवीन पर्यटकांची दिशाभूल केली जाते. तसेच यासगळ्यासाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जाते.
त्यामुळे दस्तुरी नाक्यावर घोडेवाले, कुली, रुम्स एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये. तसेच जागोजागी माहिती फलक लावण्यात यावेत , सीसीटिव्ही कॅमेरे बसवावे अशी मागणी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केली होती. ही मागणी पूर्ण झाली नाही तर माथेरान बेमुदत बंद करण्याचा इशाराही या समितीने दिला होता. याविषयीचे निवेदन या संघर्ष समितीतर्फे पोलिस अधिक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी राहुल इंगळे, वनखात्याच्या अधिकारी वर्ग व पोलिस ठाण्यांना दिले होते.
सुंदर माथेरानची बदनामी करणाऱ्या घोडेवाल्यांवर येथील प्रशासनाने जरब बसवावी, यासाठी हे माथेरान बेमुदत बंदचे आवाहन केले आहे. निवेदनाद्वारे केलेल्या मागण्यांना गांभीर्याने घेऊन त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने नाईलाजास्तव माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने बंद हाक दिली आहे. माथेरान आज १८ मार्चपासून माथेरान बेमुदत बंद राहणार आहे.