'मॅच फिक्सिंग': १३ फुटबॉलपटू निलंबित; पोलिस मौझन शेखचाही समावेश, तपासासाठी प्रकरण सीबीआयकडे
मडगाव : फुटबॉल सामन्याचे 'मॅच फिक्सिंग' केल्याच्या आरोपामुळे गोवा फुटबॉल संघटनेने (जीएफए) १३ खेळाडू व एक संघ अधिकारी अशा १४ जणांना फुटबॉलशी संबंधित सर्व उपक्रमांतून तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. त्यांना जीएफएच्या कोणत्याही सामन्याच्या ठिकाणी किंवा फुटबॉल मैदानावर प्रवेश करण्यास मनाई केली आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी सीबीआयकडे दिले आहे.
या निर्णयासंबंधीची सविस्तर माहिती गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. कायताना फर्नांडिस यांनी काल मंगळवारी पत्रकारांना दिली. यावेळी जीएफएचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढील कारवाईसाठी गोवा फुटबॉल संघटनेने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले असून, प्रकरणासंबंधी सविस्तर अहवालही सादर केला आहे.
शापोरा युवक संघ या जीएफएच्या प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या संघाने गेल्या ऑक्टोबरमध्ये गोवा फुटबॉल संघटनेकडे तक्रार केल्यानंतर हा तपास करण्यात आला होता. शापोरा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष प्रवीण दाभोळकर यांनी ही तक्रार जीएफएकडे करून आपल्या क्लबचे नऊ खेळाडू आकाश कुडणेकर, कृष्णनाथ शिरोडकर, सच्चिदानंद साटेलकर, भास्कर जल्मी, अमन गोवेकर, चेतन दाभोळकर, रोहन पेडणेकर, विनायक राणे व आकाश सनदी हे आर्थिक लाभासाठी मॅच-फिक्सिंगमध्ये सामील होते, अशी तक्रार दिली होती.
अशा गैरप्रकारांवर कारवाई केल्याबद्दल आणि गोवा फुटबॉल संघटनेकडे या प्रकरणाची तक्रार केल्याबद्दल जीएफएचे अध्यक्ष डॉ. कायतान फर्नाडिसने शापोरा युवक संघाचे अध्यक्ष प्रवीण दाभोळकर यांचे कौतुक केले व आभार मानले. सहसा कोणीही आपल्या संघातील गैरप्रकारांकडे लक्ष वेधत नाहीत, पण दाभोळकरांना जेव्हा त्याच्या संघातील घटनेबद्दल समजले, तेव्हा त्यांनी त्वरित जीएफएला कळविले, असे डॉ. फर्नाडिस म्हणाले.
सामन्यांमध्ये फेरफार आणि मॅच फिक्सिंग या गोष्टी फुटबॉलसाठी हानिकारक आहेत, त्या घडू नयेत. असे गैरप्रकार टाळण्यासाठी आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले. नीतिमता अधिकाऱ्याच्या अहवालात योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून, जीएफए आचारसंहिता २०२१ अतंर्गत निलंबन आणि इतर दंडात्मक कारवाईसह त्वरित शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
तसेच, या आरोपांची आणि गोव्यातील फुटबॉलमधील सामन्यांशी छेडछाड करण्याशी संबंधित व्यापक समस्यांची सखोल चौकशी करण्यासाठी जीएफएने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडे तक्रार करावी, अशी शिफारस देखील अहवालात करण्यात आली आहे.
निलंबित करण्यात आलेल्यात क्लबचे माजी पदाधिकारी आणि पोलीस कॉन्स्टेबल मौझन शेख याचाही समावेश असून, या प्रकरणात त्याच्या कथित भूमिकेबाबत योग्य पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी, अशी शिफारस देखील नीतिमत्ता अधिकाऱ्यांनी केली आहे. तपासातून समोर आलेल्या बाबींचे गांभीर्य लक्षात घेता, जीएफएच्या कार्यकारी समितीने सदर प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेतला असे अध्यक्ष डॉ. कायतान फर्नाडिस म्हणाले.
गेल्या काही वर्षांत गोव्यातील फुटबॉलमध्ये सामन्यांच्या सचोटीबाबत चिंताजनक बाबी समोर आल्या आहेत. परंतु, डॉ. फर्नाडिस यांनी यावर भर देताना, जेव्हा जेव्हा जीएफएसमोर विश्वसनीय पुरावे सादर केले जातील, तेव्हा तेव्हा कठोर कारवाई करण्यास सध्याचे प्रशासन कटिबद्ध असल्याचे डॉ. फर्नांडिस म्हणाले. जीएफए गोव्यातील फुटबॉलची सचोटी, विश्वासार्हता आणि 'फेअर प्ले'ची तत्त्वे जपण्यासाठी कटिबद्ध आहे आणि सर्व स्पर्धांमध्ये सचोटीवर देखरेख, शिक्षण व तक्रार निवारण यंत्रणा बळकट करणे सुरूच ठेवेल, असे शेवटी डॉ. कायतान फर्नाडिस म्हणाले.