आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा मुंबईत एल्गार; सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी
मुंबई : अनुसूचित जातींच्या 13 टक्के आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची (अ, ब, क, ड) मागणी प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ मातंग समाजाकडून मंगळवारी मुंबईत आंदोलन करण्यात आले. आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी असतानाही आंदोलकांनी सीएसएमटी स्थानक परिसर, मुंबई महापालिका मुख्यालय आणि सेल्फी पॉईंट परिसरात ठिय्या दिल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
आंदोलक रस्त्यावर उतरल्याने सीएसएमटी परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. काही आंदोलक रस्त्यावर झोपून आंदोलन करत होते, तर काही जण बेस्ट बसवर चढल्याचेही समोर आले. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली.
आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याची परवानगी असल्याने पोलिसांकडून त्यांना रस्त्यावरून बाजूला होण्याची विनंती करण्यात आली. मात्र, आंदोलक आपल्या मागणीवर ठाम असल्याचे दिसून आले. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
“अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत शासन निर्णय झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे सीएसएमटी आणि बीएमसी परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.