सौंदत्ती यल्लम्मा डोंगरासाठी मास्टरप्लॅन
धर्मादाय मंत्री रामलिंगा रेड्डी यांची माहिती : टप्प्याटप्प्याने विविध योजना राबविणार
बेळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह विविध राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री यल्लम्मादेवी डोंगर परिसराच्या विकासासाठी मास्टरप्लॅन तयार करण्यात येईल, अशी माहिती परिवहन व धर्मादाय खात्याचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली. सोमवारी 8 जानेवारी रोजी रामलिंगा रेड्डी यांनी यल्लम्मादेवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, धर्मादाय खात्याचे आयुक्त बसवराजेंद्र, यल्लम्मा देवस्थानचे कार्यकारी अधिकारी एस. पी. बी. महेश आदींसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर रामलिंगा रेड्डी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. दरवर्षी डोंगरावर लाखो भाविकांची उपस्थिती असते. उत्तर कर्नाटकातील एक प्रसिद्ध धार्मिक ठिकाण असलेल्या रेणुका यल्लम्मा डोंगराच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. खासकरून यात्रेच्यावेळी पार्किंगची व्यवस्था सुरळीत करण्याबरोबरच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सहजपणे दर्शन घेता येईल, यासाठी मास्टरप्लॅन तयार करण्याची सूचना मंत्र्यांनी दिली. दर्शनासाठी 4 ते 5 तास रांगेत उभारणाऱ्या भाविकांना सावली, पिण्याचे पाणी, शौचालय आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात, हे लक्षात ठेवून योजना तयार करावी. धर्मादाय व पर्यटन खात्याच्या संयुक्त विद्यमाने डोंगरावर विकासकामे राबविण्यात येणार आहेत. धर्मादाय खात्याशी संबंधित 87 एकर जमिनीत पुढील दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने विविध योजना राबविण्यात येणार आहेत. दरवर्षी या मंदिरापासून सुमारे 20 कोटी रुपये देणगीदाखल जमा होतात. या पैशांचा वापर मास्टरप्लॅनसाठी करता येणार आहे. सरकारकडूनही जादा अनुदान दिले जाणार आहे. पर्यटन खात्याकडूनही स्वतंत्र योजना तयार करून ठरावीक मुदतीत यल्लम्मा डोंगराचा विकास करण्यात येणार आहे, असे रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले.