For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाढ झोपेत प्रचंड खरेदी

06:27 AM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
गाढ झोपेत प्रचंड खरेदी
Massive shopping while in a deep sleep
Advertisement

काही जणांना झोपेत बडबडण्याची, किंवा झोपेत चालण्याचीही सवय असते यी आपल्यापैकी बहुतेक जणांना माहिती आहे. तथापि, ब्रिटनमध्ये एका महिलेने गाढ निद्रेत असताना लक्षावधी रुपयांची खरेदी केल्याचा प्रकार घडला आहे. या महिलेचे नाव निकोला एडवर्डस् असे आहे. तिने झोपेत असताना अनेक डिलीव्हरी कंपन्यांशी संपर्क करुन विविध वस्तूंच्या मागण्या नोंदविल्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली, तेव्हा घराच्या दारात अनेक पॅकेजेस आणि पुडे बघून तिला आश्चर्याचा धक्का बसला. मग खरा झालेला प्रकार तिच्या लक्षात आला.

Advertisement

मानसोपचार तज्ञांच्या म्हणण्यानुसार झोपेत खरेदी करण्याची सवय हा झोपेत चालण्याच्याच क्रियेचा एक भाग आहे. हा एक मनोविकार आहे. या विकाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती झोपेत असतानाच आपल्या मोबाईलवरुन विविध वस्तूंच्या मागण्या विविध कंपन्यांकडे नोंदवितो. मागणी झोपेत नोंदविली आहे, की जागेपणी, हे कंपन्याना समजू शकत नाही. परिणामी, त्यांच्याकडून मागणीप्रमाणे वस्तू डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून किंवा कुरियरच्या माध्यमातून पाठविल्या जातात. अलीकडच्या काळात डिलिव्हरी अत्यंत वेगवान झाल्याने अशा व्यक्तींना जाग येण्याअगोदरपासूनच वस्तूंची खोकी त्यांच्या घरात येण्यास प्रारंभ झालेला असतो. निकोला एडवर्डस् यांच्या संबंधातही असाच प्रकार घडला आहे. त्यांनी त्यांच्याही नकळत 1 लाख 10 हजार रुपयांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मागणी नोंदविली.

या विकारावर एक सोपा उपाय आहे. तो म्हणजे रात्री मोबाईलफोन आपल्यापासून दूर ठेवणे हा आहे. त्यामुळे झोपेत खरेदी करण्याची इच्छा झाली, तरी मोबाईल हाताशी नसल्याने न कळत मागणी नोंदविणे अशक्य होते. तसेच मोबाईलपर्यंत पोहचण्याच्या प्रक्रियेत आपल्याला जाग येते. त्यामुळे मागणी नोंदवायची की नाही, याचा विचार जागृतावस्थेत करता येतो, जो नैसर्गिक असतो.

Advertisement

Advertisement
Tags :

.