चिंबलवासियांचे आजचे महाआंदोलन होणारच
तिसवाडी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘युनिटी मॉल’ आणि ‘प्रशासन स्तंभ’ हे दोन्ही प्रकल्प स्थलांतरित केले असले तरी महाआंदोलन होणारच असल्याचा निर्धार चिंबलवासियांनी केला आहे, अशी माहिती आंदोलनाचे नेते गोविंद शिरोडकर आणि अजय खोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी रात्री उशिरा सरकारने दोन्ही प्रकल्प स्थलांतरित केल्याचे जाहीर केले होते. परंतु सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नसून आंदोलन पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही शिरोडकर आणि खोलकर यांनी सांगितले.
पर्यटन खात्याच्या पत्रकावर आक्षेप
पर्यटन खात्याने तळ्यार तलावाच्या सर्वेक्षणानंतर काढलेल्या पत्रकात युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्प चिंबल येथून हलवण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी, चिंबल ग्रामस्थांनी या निवेदनातील तांत्रिक आणि प्रक्रियात्मक कमतरतांवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. केवळ नकाशे काढणे पुरेसे नसल्याचे आणि पूर्ण वैज्ञानिक पुरावे, डीपीआर तसेच स्वतंत्र पुनरावलोकन आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. पर्यटन खात्याने नकाशे काढले, परंतु मूळ स्थळावर जलविज्ञान किंवा पर्यावरणीय जोखीम नसल्याचे ठोस वैज्ञानिक पुरावे दिले नाहीत. संपूर्ण अहवाल, डेटासेट आणि डीपीआर सार्वजनिक होऊन स्वतंत्र तपासणी होईपर्यंत निष्कर्ष अंतिम मानता येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तळ्यार तलाव 46 पक्षी प्रजातींसह समृद्ध जैवविविधतेचे केंद्र असून, गावकऱ्यांनी ते एकात्मिक जलविज्ञान आणि पर्यावरणीय प्रणाली म्हणून संरक्षण करण्यासाठी कटिबद्धता व्यक्त केली आहे. गावकऱ्यांनी अहवाल पुनरावलोकन करून पुढील भूमिका ठरवणार असल्याचे सांगितले.