कुठल्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही !
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची पत्रकार परिषद ; शक्तीपीठ विरोधात १२ मार्चला आझाद मैदानावर विराट मोर्चा
सावंतवाडी प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या १२ जिल्ह्यातून जवळपास 27 हजार एकर शेतजमीन शक्तीपीठ महामार्गासाठी जाणार आहे. या शक्तिपीठ महामार्गामुळे पश्चिम घाट पूर्णपणे धोक्यात येणार आहे. पश्चिम घाटमार्ग धोक्यात आल्यानंतर दक्षिण भारतातील जलस्त्रोत पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेत. गोदावरी ,कृष्णा, कावेरी या सर्व नद्या उद्ध्वस्त होणार आहेत . स्टील इंडस्ट्रीज ,औष्णिक ऊर्जा ,ऑटोमोबाईल आदींचे हितसंबंध या महामार्गात गुंतले आहेत. 86 हजार कोटींची गुंतवणूक असलेला हा शक्तीपीठ महामार्ग समृद्ध कोकण व पश्चिम महाराष्ट्राला खाईत लोटणारा आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ महामार्ग होऊ दिला जाणार नाही. शक्तिपीठ महामार्गा विरोधात येत्या 12 मार्च रोजी मुंबई आझाद मैदानावर भव्य विराट मोर्चा १२ जिल्ह्यातील शेतकरी ,सर्वसामान्य गोरगरीब जनता काढणार आहे . शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आता या शक्तिपीठ महामार्ग होण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधात रान उठवेल. चला कोकणातील सह्याद्री पट्ट्यातील शेतकऱ्यांनो आता जागे व्हा. तुमच्या मुळावर घाव घालणारा हा शक्तिपीठ महामार्ग होऊ नये यासाठी या लढ्यात सामील व्हा असे कळकळीचे आवाहन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे संपत देसाई ,शिवाजी मगदूम ,सम्राट मोरे,राजेंद्र कांबळे ,शब्बीर मणियार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. गेळे, आंबोली, पारपोली, असनिये तांबोळी डेगवे ते गोवा असा हा शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. या महामार्गामुळे आंबोली घाट मार्ग पूर्णपणे पोखरला जाणार आहे त्यामुळे भविष्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सह्याद्री पट्ट्याचे या शक्तीपीठ महामार्गामुळे वैभव नष्ट होणार आहे. सावंतवाडी मतदारसंघासारखा समृद्ध असा जैवविविधतेचा हॉटस्पॉट या मार्गामुळे पूर्णपणे नामशेष होणार आहे. त्यामुळे या भागाचे आमदार दीपक केसरकर यांनी या शक्तीपीठ महामार्गाबाबत आपले मौन सोडावे असे श्री देसाई यांनी स्पष्ट केले