For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्लेत ५ जून रोजी भव्य ' महा-स्वच्छता मोहीम '

03:11 PM May 30, 2026 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्लेत ५ जून रोजी भव्य   महा स्वच्छता मोहीम
Advertisement

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगरपरिषदेचा उपक्रम

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवार दि. ५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिना’ निमित्त सकाळी ७ वाजता ‘नवाबाग बीच’ येथे झुलता पूल पासून भव्य ‘महा-स्वच्छता मोहीम’ पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी राबविण्यात येणार आहे. वेंगुर्ले शहरात पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि शाश्वत विकासाचा संदेश समाजात प्रभावीपणे रुजविण्याच्या उद्देशाने, ‘झुलता पूल ते नवाबाग बीच’ या प्रमुख पर्यटन परिसरात ‘महा-स्वच्छता मोहीम’ तसेच संपूर्ण शहरासाठी ‘विशेष ई-कचरा संकलन अभियान’ राबविण्यात येणार आहे. वेंगुर्ला शहरातील ‘झुलता पूल ते नवाबाग बीच’ हा परिसर निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारा आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ असते. तथापि, वाढत्या पर्यटनामुळे प्लास्टिक व इतर कचऱ्याचा साठा वाढून पर्यावरणीय समतोल धोक्यात येत असून सागरी पर्यावरण व जैवविविधतेवर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. सदर मोहिमेत विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, युवक मंडळे, विद्यार्थी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.यासोबतच, पर्यावरण व मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या ई-कचऱ्याच्या सुरक्षित व शास्त्रीय व्यवस्थापनासाठी विशेष ‘ई-कचरा संकलन अभियान’ देखील आयोजित करण्यात आले आहे. घरगुती वापरातील जुने अथवा नादुरुस्त मोबाईल, चार्जर, इयरफोन, संगणक, लॅपटॉप, कीबोर्ड, केबल्स, दूरदर्शन संच (टीव्ही), रिमोट, मिक्सर, इस्त्री, घड्याळे, बल्ब, ट्युबलाईट तसेच इतर निकामी इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तूंचा समावेश ई-कचऱ्यामध्ये होतो. नागरिकांनी असा ई-कचरा सामान्य कचऱ्यात न टाकता शुक्रवार दि. ५ जून रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० या वेळेत शहरात फिरणाऱ्या विशेष संकलन वाहनाकडे सुपूर्द करावा किंवा नगरपरिषदेच्या इमारतीखाली कार्यरत ‘आर.आर.आर. केंद्रा’ त जमा करावा, असे नागरिकांना सुचित करण्यात आले आहे.वेंगुर्ला शहर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी या दोन्ही मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पर्यावरण संरक्षणाच्या राष्ट्रीय अभियानात आपले मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.