Solapur News: विंचूरमधील इंदिरानगरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली; दोन-तीन घरांचे मोठे नुकसान
अभिजीत जवळकोटे
विंचूर (ता. दक्षिण सोलापूर) : विंचूर येथील पंचाक्षरी विद्यामंदिरासमोरील इंदिरानगर परिसरात शनिवारी, दि. 12 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत दोन ते तीन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सरुबाई देवकते यांच्या मुलाच्या घरात अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर घराला मोठी आग लागली. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, शेजारील आंबण्णा कोळी यांच्या घरासह आणखी एका घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, पोलीस हवालदार दावणे, पोलीस शिपाई शिवणे तसेच होमगार्डच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
दरम्यान, लोकमंगल शुगर मिलच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग आणखी पसरून मोठी दुर्घटना होण्याचा धोका टळला.
घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस अधिकारी व जवानांनी दाखवलेल्या तत्परतेचे तसेच अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामगिरीचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन ते तीन घरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानीचा नेमका आकडा संबंधित यंत्रणांच्या पाहणीनंतर स्पष्ट होणार आहे.