Umarga News | वरनाळवाडीत भीषण आग; जनावरांच्या गोठ्यासह शेती साहित्य जळून खाक, ३ लाखांचे नुकसान!
वरनाळवाडीत आगीचे तांडव; गीर गाय, बैलगाडीसह धान्याची पोती भस्मसात
उमरगा - वरनाळवाडी येथे अचानकपणे लागलेल्या आगीत जनावरांचा गोठा जळून खाक झाला. यामध्ये गीर गाय, बैलगाडी , १५ पोते तूर, १५ पोते हरभरा, ज्वारी, ३ विदयुत मोटार, मोटारीचे केबल, कडबा, डिझेल इंजिन, ताडपत्री, पाईप सेट, तुरीचे भुसा सह यावेळी लागलेल्या आगीत गोठ्यातील शेती औजारेही जळून खाक झाल्याने सुमारे ३ लाखाचे नुकसान झाले.घटनेची माहिती मिळताच आलूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य आप्पासाहेब पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मदतीचा हात पुढे केला.
संकटात सापडलेल्या बाग कुटुंबीयांचे सांत्वन करत आप्पासाहेब पाटील यांनी केवळ शब्द दिले नाहीत, तर तातडीची गरज म्हणून त्यांनी बाग कुटुंबीयांना वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदत केली. यावेळी आप्पासाहेब पाटील यांनी,आगीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून प्रशासनाकडून जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. "संकट मोठे असले तरी खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत," अशा शब्दांत त्यांनी कुटुंबाला धीर दिला.