अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये भीषण आग
हॉलिवूडवर ओढवले मोठे संकट : 57 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक नुकसान : हजारो लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
वृत्तसंस्था/लॉस एंजिलिस
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील लॉस एंजिलिसमध्ये लागलेली भीषण आग मोठे नुकसान घडवून आणत आहे. आगीमुळे आतापर्यंत 5 जणांचा जीव गेला असून 1 हजाराहून अधिक इमारती भस्मसात झाल्या आहेत. लॉस एंजिलिस हे शहर हे हॉलिवूड कलाकारांचे घर मानले जाते, अशा स्थितीत हॉलिवूडसाठी हे मोठे नुकसान मानले जात आहे. आगीच्या संकटामुळे हजारो लोकांना स्वत:चे घर अन् व्यवसाय सोडून स्थलांतर करावे लागले आहे. खराब स्थिती पाहता कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गाविन निवसम यांनी आणीबाणीची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या लॉस एंजिलिस येथील निवासस्थानापर्यंत आग पोहोचल्याचे समोर आले आहे. लॉस एंजिलिसच्या आगीला जोरदार वाऱ्यांनी अधिकच भडकविले आहे. मंगळवारी भडकलेली आग 112 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असल्याने तीव्र झाली आहे. यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळणे अवघड ठरले. वारे वाहत असल्याने विमानांद्वारे आग विझविणेही कठिण ठरले आहे. मंगळवारी विमानांची मदत रोखण्यात आली होती. तर बुधवारी पुन्हा विमानांनी या कामात भाग घेतला आहे.
हॉलिवूडला फटका
आगीच्या तावडीत हॉलिवूडही होरपळून निघत आहे. साइन सारख्या प्रसिद्ध स्थळांपर्यंत आग पोहोचली आहे. हॉलिवूडला मोठे नुकसान होणार असल्याचा अनुमान आहे. 1400 हून अधिक अग्निशमन जवान आग विझविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रभावित भागांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी मदतशिबिरांची स्थापना करण्यात आली आहे. लॉस एंजिलिसच्या अग्निशमन दलाने सर्व सुटी रद्द करत कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविले असल्याची माहिती कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गाविन निवसम यांनी दिली.
पॅरिस हिल्टनचे घर भस्मसात
कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या या आगीने हॉलिवूड कलाकारांना स्वत:चे घर सोडण्यास भाग पाडले आहे. पॅसिफिक पॅलिसेड्सच्या काठावर एक पर्वतीय भाग असून तेथे कलाकारांची घरे आहे. येथे भयानक आग फैलावल्यामुळे अनेक कलाकारांना स्वत:चे घर गमवावे लागले. अनेकांनी स्वत:च्या घरातील सामानाची पर्वा न करता तेथून स्थलांतर केले आहे. जगप्रसिद्ध पॉप गायिका पॅरिस हिल्टनचे घरही आगीत जळून खाक झाले आहे.
प्रचंड नुकसानाची भीती
आगीमुळे 52-57 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अनुमान अॅक्यूवेदरने व्यक्त केला आहे. सर्वाधिक नुकसान पॅसिफिक पालिसेड्समध्ये झाले आहे. या आगीच्या संकटाला लॉस एंजिलिसच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी आग म्हटले जात आहे. या आगीच्या संकटाने नोव्हेंबर 2008 मधील सायरे फायरला मागे टाकले आहे. त्यावेळी 604 इमारती नष्ट झाल्या होत्या. तर यंदाच्या संकटात एक हजाराहून अधिक इमारतींचे नुकसान झाले आहे.