कॅनडाच्या सैन्यतळावर विस्फोटानंतर भीषण आग
वृत्तसंस्था, ओटावा
कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतातील एका सैन्यतळावर शनिवारी भीषण आग लागल्याने अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. ही घटना ‘कॅनेडियन फोर्सेज बेस वेनराइट’मध्ये (सीएफबी) घडली आहे. हा सैन्यतळ वेनराइट शहरानजीक स्थित असून संरक्षणमंत्री डेव्हिड मॅकगिन्टी यांनी बळी अन् जखमींची पुष्टी दिली. सैन्यतळावरील आगीच्या घटनेत कमीतकमी 7 सैनिक मृत्युमुखी पडले आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी या घटनेचे वर्णन गंभीर घटना असे केले. तसेच अल्बर्टा सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
वेगवान वाऱ्यामुळे आग पसरली
स्थानिक माध्यमांनुसार शनिवारी संध्याकाळी सैन्यतळावर आग लागली आणि त्यानंतर वेगवान वाऱ्यामुळे आग पसरली. हा सैन्य तळ अल्बर्टाची राजधानी एडमंडनपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आग्नेय दिशेला आहे. अल्बर्टाचे प्रीमियर डॅनियम स्मिथ यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. या दुर्घटनेत अनेक सैनिक प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बचावकार्य करणाऱ्या आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
आग नेमकी कशामुळे लागली, तसेच मृत आणि जखमींची अचूक संख्या किती आहे याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. कॅनडातील विरोधी पक्षाचे नेते पियरे पोइलीव्हर यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी नागरिकांना प्रभावित कुटुंबांसाठी प्रार्थना करण्याचे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि आपत्कालीन वाहनांसाठी रस्ते मोकळे ठेवण्याचे आवाहन केले.
दरम्यान अल्बर्टामध्ये कॅनडापासून स्वतंत्र होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यासंबंधीच्या प्रस्तावावर मतदान होण्याच्या काही दिवस आधी ही घटना घडली आहे. अधिकारी सध्या परिस्थितीचा आढावा घेत असून आगीच्या कारणांचा तपास करत आहेत.